भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीचे विलास काटेखाये अध्यक्षपदावर निवडून आले.
पूर्व विदर्भातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकण्याची साक्ष मिळाली आहे. 30 जुलै 2025 रोजी भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास रामकृष्ण काटेखाये हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीच्या पॅनेलमधून विजय मिळवून आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या समर्थित उमेदवार विवेक पटोळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला तब्बल दोन दिवसांत दुसऱ्यांदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे या पक्षाच्या राजकीय स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले यांना महायुतीचा विजय रोखण्यात यश मिळाले नाही. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत देखील नाना पटोले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता दुग्ध संघाच्या निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डॉ. परिणय फुके हे केवळ राजकारणातच नव्हे तर बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ओळखले जातात. बुद्धिबळातील चालींचा त्यांना खोलवर अभ्यास आहे. कोणते प्यादे पुढे ढकलायचे आणि कोणाला आऊट करायचे हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केले आहे.
काँग्रेससाठी कठीण काळ
डॉ. फुके यांच्या या रणनीतीमुळेच भंडारा जिल्ह्यातील महायुतीला पुनरुज्जीवन मिळाले आहे. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या 12 संचालकांपैकी काँग्रेसचा एक संचालक मतदानादरम्यान गैरहजर होता. ज्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या युतीला झाला. विलास काटेखाये यांनी सहा मते मिळवून अध्यक्षपदावर नाव नोंदवले. तर काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त पाच मते मिळाली. या निकालानंतर काँग्रेसच्या नेतृत्वावर नव्या प्रश्नांची उभारणी झाली आहे. विशेषतः नाना पटोले यांच्या कामगिरीवर. भंडारा जिल्ह्यातील या निवडणुकीचा निकाल पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झालेल्या अपयशानंतर आता दूध संघाच्या निवडणुकीत देखील पराभवाने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काहींचा असा अंदाज आहे की, या पराभवाचे खापर पुन्हा नाना पटोले यांच्यावर फोडले जाऊ शकते. पूर्व विदर्भातील या महायुतीच्या विजयामुळे काँग्रेससाठी आणखी कठीण काळ सुरू होण्याची शक्यता आहे. तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युतीने आपल्या ताकदीचा जोरदार दाखला दिला आहे. आता आगामी काळात या राजकीय घडामोडींचा प्रदेशावर कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
