राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या कागदपत्रांची चौकशीची मागणी केली होती.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्यमय घडामोडींचा धुरळा उडाला आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या चर्चांनी वातावरण तापलेले असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ कॉल सोशल मीडियावर वायरल झाला आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या कॉलमध्ये अजित दादांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी केलेला संवाद चर्चेचा विषय ठरला. पण या प्रकरणाला खऱ्या अर्थाने रंग चढवला तो अजित दादांचे खंदे समर्थक आणि आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी.
मिटकरी यांनी थेट अंजना कृष्णा यांच्या जातीपत्रापासून ते शैक्षणिक पात्रतेपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण, अवघ्या काही तासांतच मिटकरींनी यूटर्न घेत माफी मागितली आणि हा वाद नवा रंग घेऊन पुढे सरकला. मिटकरींच्या या आक्रमक पवित्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही चर्चांना उधाण आले. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, अंजना या कालपरवाच नव्हे, तर गेल्या काही वर्षांपासून आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मग त्यांच्याबाबत एवढा संशय का उफाळला? मिटकरींच्या या पत्रामुळे अजित दादांवरही टीकेची झोड उठली.
Mahayuti : मराठा आरक्षणाचं यश गाजलं, पण श्रेयासाठी ‘देवाभाऊं’चं बॅनर सजलं
अकोल्यातील वादग्रस्त प्रसंग
सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात दादांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. शेवटी, दबाव वाढताच मिटकरींना बिनशर्त माफी मागावी लागली. पण हा पहिलाच प्रसंग नाही, जिथे मिटकरींना माफीचा सूर लावावा लागला आहे.यापूर्वीही अमोल मिटकरींच्या आक्रमक शैलीमुळे ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. निवडणूक काळात अजित दादांच्या मीडिया मॅनेजरने दादांच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हाही मिटकरींनी त्यावरून वादळ निर्माण केले होते. तेव्हा अजित पवारांनी पार्थ पवार यांच्यामार्फत मिटकरींना तुम्ही या प्रकरणात जास्त गुंतू नका, असा सल्ला दिला होता. अकोल्यातही राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मिटकरींनी वाद ओढवून घेतला. त्या वादात मनसेच्या आंदोलनादरम्यान एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि मिटकरी एकटे पडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही नेता, अगदी अजित दादासुद्धा त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. या सगळ्या घटनांमुळे मिटकरींच्या आक्रमक शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिटकरींनी यूपीएससीला लिहिलेल्या पत्रात अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक पात्रता, जातीच्या प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रांची छाननी करण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले. पण जेव्हा टीकेची झळ दादांपर्यंत पोहोचली, तेव्हा मिटकरींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ‘सोलापूर घटनेबाबत केलेला ट्वीट मी बिनशर्त मागे घेतो. ही माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाची नाही. मला पोलीस दल आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांबद्दल आदर आहे. या माफीने वादावर पडदा पडला असला, तरी मिटकरींची ही आक्रमक शैली आणि वारंवार माफी मागण्याची सवय यावर राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा सुरू आहे.
