महाराष्ट्र

Anil Deshmukh : मतदारयादीत ‘डबल रोल’; भाजप नेत्यांकडे दोन-दोन ओळखपत्रं

Vote Theft Controversy : अनिल देशमुखांचा स्फोटक आरोप

Post View : 2

Author

लोकशाहीच्या मंदिरातच जर मतपेटीची लूट झाली, तर जनतेच्या विश्वासाचं काय? अशाच शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून तब्बल ३५ हजार मतांची चोरी झाल्याचा स्फोटक आरोप केला आहे.

लोकशाहीचा आत्मा असलेली मतपेटीच जर लुटली गेली, तर निवडणूक नावाचा सोहळा केवळ एक दिखावा ठरत नाही का? हा प्रश्न आता काटोलच्या जनतेसमोर उभा राहिला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी हरियाणात मतचोरीचा आरोप करत पुरावे सादर केले आणि त्यानंतर काहीच दिवसांत महाराष्ट्रातही असा आरोप समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशमुख म्हणाले, आमच्या काटोल मतदारसंघात तब्बल 35 हजार हून अधिक मतांची चोरी झाली आहे. आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून मतदार यादी तपासणीचं काम करत होतो आणि आता जे समोर आलंय ते लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.

Bhandara BJP : पक्षबांधणीला धार; आले भाजपात काशिवार

सीमेपलीकडील मतदार 

देशमुख यांनी आरोप केला की, मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावांमधून लोकांना आणून काटोलमध्ये मतदान घडवून आणलं गेलं. सीमेवर लांघा हे गाव आहे. तिथल्या सरपंचांसकट अनेकांनी आमच्या मतदारसंघात मतदान केलं. एवढंच नव्हे तर काही भाजप पदाधिकाऱ्यांकडे दोन दोन मतदान ओळखपत्रे आहेत, असा धक्कादायक दावा देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

अनिल देशमुख यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या विरोधात निवडून आलेले भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या दोन भावांची नावे सुद्धा मतदार यादीत दोन वेळा असल्याचे पुरावे त्यांच्या टीमकडे आहेत. “हे केवळ निवडणुकीतला पराभव नाही, हा जनादेशावर डाका आहे,” असं ते म्हणाले. राहुल गांधींनी हरियाणात ‘25 लाख बनावट मतदार’ असल्याचा दावा केला आणि आता देशमुखांनी महाराष्ट्रात ‘35 हजार चोरीच्या मतांचा’ ठपका ठेवला, यामुळे मतदार याद्यांतील अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पेट घेण्याची चिन्हं आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!