खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात झाली.
महाराष्ट्राच्या राजकीय पटावर भारतीय जनता पक्षाने इतिहास रचला आहे. सदस्य नोंदणीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळवत, दीड कोटी सदस्यसंख्या गाठणारा भाजप हा राज्यातील पहिला पक्ष ठरला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानेही सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ झाला. या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यासाठी विशेष बैठका, प्रचार कार्यक्रम आणि बूथस्तरीय नियोजन सुरू करण्यात आले आहे. पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणी मोहिमेची सुरुवात झाली. या वेळी माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे आणि कमलबापू बहेकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या गडावर हर्षवर्धन सपकाळांची सद्भावना मोहीम
महिलांचा सक्रिय सहभाग
तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या अभियानात पूर्ण ताकदीने उतरले आहेत. घराघरात पोहोचून नागरिकांना पक्षात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियानादरम्यान प्रत्येक गावातील चावड्यांवर बैठकांचे आयोजन करून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करण्यात येणार आहे. विशेषतः युवक वर्ग आणि महिलांचा या अभियानात मोठा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाचे संघटन आणखी मजबूत होईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे माजी समाजकल्याण सभापती हंशाताई खोब्रागडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पक्षात सामील होऊन महिला नेतृत्वाला नवे बळ दिले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला सामाजिक आणि राजकीय पातळीवर अधिक मजबूत आधार मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करत लोकांना पक्षात आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्याभरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढणार आहे, यात शंका नाही.
पवार गटाच्या नोंदणी मोहिमेचा उद्देश फक्त सदस्य वाढवणे नसून, प्रत्येक नव्या सभासदाच्या मनात पक्षाविषयी निष्ठा आणि विश्वास निर्माण करणे हा आहे. येत्या काळात अशाच प्रकारच्या अभियानांद्वारे पक्ष जनता आणि कार्यकर्त्यांच्या संवादात नवे आयाम निर्माण करणार आहे.
