
पवार कुटुंब एकत्र येण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या आई आशाताई पंढरपूरला होत्या. पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घेतले. पवार कुटुंब एकत्र यावे म्हणून आपण प्रार्थना केली, असे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी विठुरायाला साकडे घातल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात अकोल्यातील विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन आमदारांवर हल्लाबोल केला आहे. या दोन्ही आमदारांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र नको आहेत. त्यामुळे हे दोघेही काका आणि पुतण्याच्या नात्यांमध्ये विष कालवण्याचे काम करतात, अशी टीका आमदार मिटकरी यांनी केली. ही टीका करताना त्यांनी आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनेक आरोप केले.

याच दोघांमुळे Dispute
शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद निर्माण करण्यामागे या दोघांचा हात आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे पवार कुटुंबाला एकत्र येऊ देत नाहीत. हे दोघंच मुख्य अडथळा आहेत. आशाताईंनी व्यक्त केलेल्या भावना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. शेवटी पवार कुटुंबातील वरिष्ठ लोक यावर एकत्र येण्यावर निर्णय घेतील असेही मिटकरी यांनी नमूद केले. अजितदादांनी आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. आता आगामी वर्षांमध्ये नव्या दमाने काम करताना दिसेल, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले.
2025 डिसेंबरपर्यत अजितदादांचं नेतृत्व महाराष्ट्रात आणखी ठळकपणे समोर येणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. भूतकाळातील आपल्या चुका सावरत नवीन वर्षात काम करणार असल्याचा संकल्प अमोल मिटकरी यांनी स्वतःसाठी केला. गेल्या काळामध्ये अमोल मिटकरी यांच्या विधानांमुळे राजकीय वाद निर्माण झाला होता. मिटकरी यांनी केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतापले होते. अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेत मनसेच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये मोलाची मदत करणाऱ्या अरोरा यांच्यावरही अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यानंतर पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी मिटकरी यांना चांगली समज दिली होती. त्यामुळे भूतकाळातील चुका दुरुस्त करत भविष्यामध्ये वाटचाल करणे मिटकरी यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. या सगळ्यात त्यांनी आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावे ही आपली देखील इच्छा असल्याचे ते म्हणाले.