
राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री सध्या अडचणीत सापडले आहे. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
बीड येथील हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य केल्या आरोपावरुन माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा मागण्यात येत आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनं सावध भूमिका घेतली आहे. यासंदर्भात अकोल्याचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी सोमवार, 3 मार्चला विधान भवनात स्पष्ट भूमिका व्यक्त केली. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणालाही शिक्षा देता येणार नाही, असं मिटकरी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा कठोर भूमिका घेतली आहे. गुन्हा करणाऱ्या कोणालाही अजित पवार पाठिशी घालत नाहीत. त्यामुळं कोणी दोषी असेल तर त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई केली जाईल, असंही आमदार मिटकरी म्हणाले. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांची कायदेशीर चौकशी सुरू आहे. परंतु काही लोक विनाकारण त्यावर राजकारण करीत असल्याची टीकाही आमदार अमोल मिटकरी यांनी केली. केवळ आरोपांच्या आधारावर कोणाचाही राजीनामा घेणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे.

अवमान खपविणार नाही
प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्याचे ठोस पुरावे आहेत. महाराजांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळं प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी विधान भवन परिसरात बोलताना केली. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करण्याचा ‘ट्रेंड’ सुरू झाला आहे. पात्रता नसलेले व्यक्तीही बेताल वक्तव्य करीत आहेत. अशा सर्वांना वेळीच धडा शिकविणे गरजेचे असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
आमदार अमोल मिटकरी यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या संदर्भात व्यापक पोस्ट केल्या होत्या. सोशल मीडियावरून त्यांनी कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी केली होती. याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटावरून अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हे यांनाही टार्गेट केलं होतं. आता यासंदर्भात आपण आवाज उठविणार असल्याचंही मिटकरी यांनी स्पष्ट केलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आदी महापुरुषांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आदराची भूमिका आहे. कोणत्याही महापुरुषाचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही, असंही आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.