महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : शरद पवार गटाला दे धक्का 

Nagpur : हिंगण्यातून राष्ट्रवादी नेत्याचा भाजपात प्रवेश

Share:

Author

राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगण्यातील एक मोठा चेहरा पक्षाला सोडचिठ्ठी देऊन थेट भाजपमध्ये दाखल झाला आहे. 

नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील महिला नेत्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला बोढारे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला.

बावनकुळे यांनी सांगितले की, उज्ज्वला बोढारे यांच्या नेतृत्वाखाली 18 सरपंच आणि 90 ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि बळ देणारा क्षण आहे. उज्ज्वला बोढारे यांसारखं सक्षम नेतृत्व भाजपमध्ये आल्याने पक्ष अधिक बळकट होईल. यावेळी भाजपमध्ये एका माजी नगरसेवकासह ग्रामपंचायत सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्यांनीही प्रवेश केला. यामुळे हिंगणा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची घसरण निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. ह्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का बसला आहे.

नेतृत्व बदल

उज्ज्वला बोढारे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अत्यंत सक्रिय आणि लोकप्रिय महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्या दोन वेळा हिंगणा तहसीलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. राजकारणात त्या प्रामुख्याने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रमेश बंग यांच्या गटाशी जोडल्या गेल्या होत्या. 2024 मधील विधानसभा निवडणुकीसाठी हिंगणा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याची त्यांची तयारी होती. मात्र, योग्य वेळी रमेश बंग स्वतःच रिंगणात उतरल्याने त्यांचा राजकीय आत्मविश्वास ढासळला. त्यामुळे त्या पक्षाकडून नाराज झाल्या होत्या.

Eknath Shinde : शुभेच्छांचे मुखवटे, नाराजीचे वारे

ही नाराजी ओळखून भाजपने त्यांना पक्षात सामील होण्याचे निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्विकारले. भाजपने हिंगणा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांना आपल्याकडे वळवून आपली पकड मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. हिंगणा क्षेत्रात भाजपच्या या डावामुळे आता एनसीपी आणि काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. समीर मेघे यांच्या नेतृत्वात भाजपने स्थानिक पातळीवर बळ वाढवत एकसंध संघटनात्मक ताकद उभी केली आहे. उज्ज्वला बोढारे यांच्या प्रवेशामुळे महिला मतदारांमध्येही भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, येत्या काळात हिंगणा परिसरात भाजपची स्थिती अधिक मजबूत होईल. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट फायदा होऊ शकतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!