देशाच्या राजकारणात उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा रंग भरला जातोय. एनडीएकडून पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन अनपेक्षित खेळी खेळण्याचे संकेत मिळत आहेत.
भारतीय राजकारणाचा रंगमंच पुन्हा एकदा ताणला जातोय. पण यावेळी केंद्रस्थानी आहे देशाचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद, उपराष्ट्रपतीपद. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं असून, 9 सप्टेंबर 2025 रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. परंतु या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावेळी नेहमीपेक्षा खूप वेगळा असणार आहे. कारण एनडीएकडून राबवली जात असलेली रणनीती नेहमीच्या राजकीय समीकरणांना हादरा देणारी ठरू शकते.
सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, भाजपकडून यंदा पारंपरिक आणि अपेक्षित नावांपासून पूर्णतः वेगळं, एक अनपेक्षित आणि राजकीय दृष्टिकोनातून ‘धक्का देणारं’ व्यक्तिमत्त्व उपराष्ट्रपतीपदासाठी पुढे आणण्याचे संकेत आहेत. भाजप आणि एनडीएने ज्या पद्धतीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे, त्यातून स्पष्ट होतं की या निवडणुकीला ते औपचारिकता म्हणून न पाहता, पूर्ण ताकदीने राजकीय शिडी म्हणून वापरणार आहेत.
नड्डा यांच्यावर जबाबदारी
या संपूर्ण रणनीतीचं नेतृत्व देण्यात आलं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे. एनडीएच्या आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा झाली आणि उमेदवार निवडीपासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंतची सर्व सूत्रं नड्डा यांच्या हाती देण्यात आली. यावरूनच भाजप या निवडणुकीकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे अधोरेखित होतं.
भाजपकडून जाहीर केला जाणारा उमेदवार इतका अनपेक्षित असेल की विरोधकांसाठी ही निवडणूक एक गूढ भासत जाईल. कारण हा उमेदवार कोण? त्याचं पार्श्वभूमी काय? आणि या नावामागे भाजपचा काय विशिष्ट हेतू आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. भाजपची ही खेळी म्हणजे विरोधकांना गृहित धरण्याची कोणतीही संधी न देता त्यांच्यासमोर कोडं उभं करणं आहे.
स्थिती पूर्णतः वेगळी
यंदा भाजपकडे लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, विरोधकांची इंडिया आघाडीही सज्ज झाली आहे. मागील निवडणुकीत एनडीएकडे संख्याबळाच्या जोरावर सहज विजय मिळाला होता. मात्र या वेळेस स्थिती पूर्णतः वेगळी आहे. विरोधक जर एकत्रित येऊन एखादं सर्वमान्य, विद्वान आणि समावेशक व्यक्तिमत्त्व पुढे आणतील, तर ही निवडणूक एनडीएला सहज मिळवता येईल असंही नाही.
इंडिया आघाडीकडून माजी राजकारणी, प्रबुद्ध विचारवंत, उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती किंवा माजी राज्यपाल यांपैकी कोणी तरी उमेदवार ठरवण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्याकडेही अंतर्गत समन्वयाचा मोठा प्रश्न असून, सर्व घटकपक्षांचा पाठिंबा मिळवणे हे एक मोठं आव्हान असेल.
प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व
ही निवडणूक केवळ औपचारिक प्रक्रिया राहणार नाही, तर एक प्रकारचं पॉलिटिकल थ्रिलर ठरणार आहे. आकस्मिक घडामोडी, आश्चर्यकारक घोेषणा, धक्कादायक फेरबदल आणि अंतिम क्षणी बदलणारी समीकरणं, हे सगळं पाहायला मिळेल. विशेषतः कारण उपराष्ट्रपती हे केवळ प्रतिष्ठेचं पद नसून राज्यसभेच्या सभापतीच्या भूमिकेतून संसदेच्या कारभारावर प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्त्व ठरतं.
या निवडणुकीत फक्त ‘उपपद’ नाही, तर संसदीय राजकारणाची दिशा ठरवणारी एक निर्णायक लढत घडणार आहे. एनडीएकडून येणारा चेहरा कोण असेल? विरोधकांना एकत्र आणणारा नेता कोण ठरेल? आणि या सर्व खेळातून कोण बाजी मारणार, याची उत्तरं मिळतील 9 सप्टेंबरला.