अकोला भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर होताच शहरात निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल वाजला आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून भाजपने सत्तेच्या किल्ल्यावर झेंडा फडकावण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे.
अकोल्याच्या राजकीय आसमंतात आज एक नवा सूर्योदय झाला. भारतीय जनता पक्षाच्या अकोला महानगरच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा होताच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या चेहऱ्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनुभव आणि जोशाचा संगम साधत भाजपने ‘नव्या दमाच्या नेतृत्वा’कडे पहिला पाऊल टाकलं आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलेल्या फर्मानामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा रणसंग्राम लवकरच पेटणार आहे. त्याआधीच अकोल्यात भाजपने आपलं रणनीतिक शस्त्र सज्ज केलं आहे. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अंतर्गत कुरबुरी, दुसरीकडे शिवसेनेच्या गोंधळलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, भाजपने शांतपणे आपला मोर्चा आखायला सुरुवात केली आहे.
शहरातलं नेतृत्व
कार्यकारिणीत काही नामांकित आणि नवोदित कार्यकर्त्यांचा समावेश झाल्यामुळे शहर भाजपचं नेतृत्व आता अधिक गतिमान होणार, अशी शकतात आहे. विशेष म्हणजे, या कार्यकारिणीतून शहरातल्या विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युवा शक्ती, महिला वर्ग, व्यवसायिक समाज, शिक्षण क्षेत्र यांचं प्रतिनिधीत्व यावेळी प्रकर्षाने दिसून येतं. या कार्यकारिणीमुळे शहरात ‘नेतृत्वाचा ताज नव्या डोक्यावर’ चढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अकोला महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत भाजपने झेंडा फडकावला असला तरी, गेल्या काही वर्षांत भाजपच्या स्थानिक गटात अंतर निर्माण झालं होतं. ही नवी कार्यकारिणी ही दरी भरून काढेल, असं भाजपच्या नेत्यांचं मत आहे. नव्या कार्यकारिणीतून संदेश स्पष्ट आहे की, ‘पुरातन कार्यकर्त्यांचा सन्मान आणि नव्या दमाला संधी.’
पावलं अजूनही धूसर
भाजपची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर इतर पक्ष देखील अद्यापही अंतर्गत मतभेदात अडकलेले दिसत आहेत. अलीकडेच शिवसेना एकनाथ शिंदे गटात कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या संपर्कप्रमुखावर तीव्र नाराजी नोंदविण्यात आली. आघाडीचं नेतृत्व कोणी करायचं? उमेदवार ठरवायचे कसे? या सर्व प्रश्नांमध्ये गोंधळ दिसतोय. अकोल्यातील राजकारण सध्या भाजपकडे वळताना स्पष्ट दिसतंय. अकोला भाजपने आहे की, येणाऱ्या काळात ‘सेवा कार्य’ हेच पक्षाचं मुख्य ब्रीदवाक्य असणार आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने, स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणं आणि मतदारांशी थेट संवाद साधणं, या गोष्टींवर भर दिला जाणार आहे.