अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी काँग्रेस आणि भाजप नेत्यांवर टीका करत मुस्लीम समाजाच्या विकासासाठी मराठी आणि इंग्रजी शिक्षण अनिवार्य करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही. प्रसारमाध्यमांचे माईक आणि कॅमेरे समोर येताच अनेक नेते अगदी कोणतेही भान न ठेवता बोलत राहतात. मात्र अशा वक्तव्यांचा फटका पक्षाला आणि विशेषतः पक्षप्रमुखांना बसतो, हे ते वारंवार विसरतात. काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळेच अशा वक्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्षप्रमुखांना नेहमीच धावपळ करावी लागते. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या पार्श्वभूमीवर आपली मतं मांडताना काँग्रेसवर घणाघात केला आणि भाजपा नेते नितेश राणेंनाही चांगलेच फैलावर घेतले.
राणे यांना फक्त चर्चेत राहायचं आहे. म्हणूनच ते मुस्लिम समाजावर आरोप करत राहतात. मात्र, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच नाव खराब होते. आम्ही शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा प्यारे खान यांनी दिला.प्यारे खान म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसने केवळ मुस्लीम समाजाचा वापर केला. मतांसाठी त्यांना मूर्ख बनवले आणि समाजाचे फार मोठे नुकसान केले. त्यांनी भाजपविरोधी विषारी प्रचारावरही टीका केली. गुजरात दंगल, बाबरी मशीद या विषयांमध्ये अडकून पडण्यात काही अर्थ नाही. विकासासाठी पुढे जावे लागेल, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत काम केल्याचा अनुभव सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, विकासाचे एक ध्येय ठेऊन आम्ही काम करत आहोत.
सकारात्मक राष्ट्रनिर्माण संदेश
अध्यक्षपद स्वीकारताच अल्पसंख्यांक शाळा सुधारण्यास सुरुवात केली. उर्दू भाषेला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, विज्ञान आणि गणित शिकवण्यासाठी मराठी आणि इंग्रजीची आवश्यकता आहे.खान यांनी मुस्लीम विद्यार्थ्यांच्या मागे पडण्याचे कारण स्पष्ट करताना मराठी भाषेचा अभाव दाखवला. पोलीस भरतीसारख्या स्पर्धात्मक परीक्षा मराठीत असल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थी अपयशी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला असून अनेक शाळांनी ते मान्य केले आहे, असेही त्यांनी सांगितले.शिक्षण व्यवस्थेमध्ये नातेवाईकांना नोकरी देण्याची प्रथा मोडून काढण्यात आम्ही यशस्वी ठरलो असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षणाशिवाय आता मुस्लीम समाजाचा विकास शक्य नाही, हे सगळ्यांना समजून घ्यावं लागेल, असे ते ठामपणे म्हणाले.आजवर अल्पसंख्यांक आयोग काय करतो, हेच लोकांना माहीत नव्हते. परंतु गेल्या वर्षभरात विविध धर्मीय समाजासाठी काम सुरू झाले आहे. खास करून मुस्लीम महिलांसाठी आयोगाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तलाकचं प्रमाण रोखण्यास यश आले असून, बहुपत्नीत्व रोखण्यासाठी आयोगाने मध्यस्थी करत अनेक संसार वाचवले आहेत.सरकारला बदनाम करून कुणाचाच विकास होणार नाही. भारत हा सर्वांचा देश आहे. प्रत्येकाने कौशल्य विकसित करून पुढे यावे, हेच खरं राष्ट्रनिर्माण आहे, असा सकारात्मक संदेश देत प्यारे खान यांनी मुस्लीम समाजाच्या विकासाचा मार्ग स्पष्ट केला.