
भाजपच्या नवीन कार्यालय भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एक महत्वाचा सल्ला दिला.
उपराजधानी नागपुरात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ठाम आणि परखड भाषणाने. स्पष्ट वक्तृत्वासाठी ओळखले जाणारे गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या रोखठोक शैलीने राजकीय व्यासपीठ गाजवले.पक्षाच्या अंतर्गत रणनीतीवर भाष्य करत प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्त्वाचा सल्ला दिला. ज्या चुका मी केल्या, त्या तुम्ही करू नका, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांना जाती सेल संदर्भात सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला.

गडकरींनी त्यांच्या अनुभवाचे उदाहरण देत स्पष्ट केले की, जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी विविध जातींसाठी सेल (प्रकोष्ट) सुरू केले होते. मात्र, हा प्रयोग पक्षासाठी फारसा लाभदायक ठरला नाही. मी अनेक जाती सेल सुरू केले. त्याला विरोध देखील झाला, पण सर्व जातींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने मी तो निर्णय घेतला. मात्र, यामुळे पक्षाला कोणताही फायदा झाला नाही. उलट, पक्षात आलेल्या नेत्यांनाही त्यांच्या स्वतःच्या समाजाकडून पाठिंबा मिळाला नाही, असे ते म्हणाले.
भाजपची ताकद
गडकरी पुढे म्हणाले, महानगरपालिका निवडणुक जसजशी जवळ येतील, तसतसे बावनकुळे यांच्याकडे जात सेलकडून तिकीटांसाठी अनेक पत्रे येतील. तेव्हा त्यांना समजेल की जात सेल बनवण्याची कल्पना किती चुकीची होती. गडकरींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुटुंबाचा भाग मानण्याचे महत्त्व अधोरेखित केले. भाजप हे कुटुंब आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा या कुटुंबाचा सदस्य आहे. पक्षातील प्रत्येकाने आपल्या मुलांप्रमाणे कार्यकर्त्यांवर प्रेम करावे.
आपल्यालाही तिकीट मिळावे ही भावना स्वाभाविक आहे, पण कार्यकर्तेही आपल्या कुटुंबाचा भाग आहेत, असे त्यांनी सांगितले. गडकरींनी स्पष्ट केले की पक्ष हा केवळ नेत्यांसाठी नसून कार्यकर्त्यांसाठीही आहे. भाजपची ताकद ही त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे हा पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांना अधिक संधी द्या, असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. यासह, भाजपच्या 46 स्थापना दिनाच्या निमित्ताने सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यालयासाठी योगदान
कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यालय उभारणीसाठी निधी संकलनाविषयीही चर्चा केली. बावनकुळे यांनी सांगितले की आनंदराव ठवरे यांनी या कार्यालयासाठी एक लाख रुपये दिले आहेत, तर फडणवीसांनीही स्वतः पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. त्यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे योगदान देण्याचे आवाहन केले.हा सोहळा केवळ कार्यालयाच्या भूमिपूजनापुरता मर्यादित नव्हता, तर पक्षाच्या भविष्यातील दिशेची स्पष्टता देणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला.