
जग एका धगधगत्या वळणावर उभं आहे. जर भान राहिलं नाही, तर तिसरं महायुद्ध कुठल्याही क्षणी भडकू शकतं. या थेट आणि स्पष्ट इशाऱ्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या व्यासपीठावरून संपूर्ण जगाच्या विवेकाला हादरा दिला आहे.
देशात सर्वत्र महामार्गांचे जाळे पसरविणारे विकास पुरुष केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्धांची वाढती तीव्रता आणि मानवीतेवर घोंघावत असलेले संकट याबाबत अत्यंत तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली. सध्या जगभर संघर्षाचं धुमसतं वातावरण आहे. इराण-इराक-इस्रायलमधलं संघर्षजन्य युद्ध, रशिया-युक्रेनमधलं अखंड चालणारं युद्ध. या साऱ्या पार्श्वभूमीवर जग कधीही एका महायुद्धाच्या खाईत कोसळू शकतं, अशी स्थिती तयार झाली आहे. ही वाटचाल विनाशाच्या दिशेने सुरू आहे, असं स्पष्ट भाष्य करत गडकरींनी शांततेच्या गळ्यात युद्धाचं दोर टाकणाऱ्या महासत्तांना अप्रत्यक्ष इशाराच दिला.

नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते. गडकरींनी वर्तमानातील युद्धतंत्रावर मार्मिक भाष्य केलं.
पूर्वी युद्ध रणांगणावर रणगाडे, तलवारी, तोफा आणि लढाऊ विमानांनी लढली जायची. पण आज युद्धाचा चेहराच बदलला आहे. ड्रोन, मिसाईल्स, सायबर अटॅक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ही युद्धाची नवी अस्त्रं बनली आहेत. नागरी वस्त्यांवर हल्ले होतात, निष्पाप जनता भरडली जाते आणि मानवीतेच्या मूल्यांची राखरांगोळी होते, असं सांगत त्यांनी युद्धाच्या नव्या शस्त्रक्रांतीबाबत जगाला सावध केलं.
भारताची जबाबदारी मोठी
गडकरी पुढे म्हणाले, भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे. शांततेचा, अहिंसेचा, सहिष्णुतेचा संदेश देणारा! पण जगातील महासत्तांमधील अहंकार आणि हुकूमशाही वृत्तीमुळे प्रेम, सौहार्द आणि मानवतेचा अंत होत चाललाय. अशा स्थितीत भारताने मध्यस्थ, विचारवंत आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका घ्यायला हवी.
‘बियॉन्ड बॉर्डर्स’ हे केवळ पुस्तक नाही, तर ते आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आणि मानवी मूल्यांच्या सीमारेषा पार करणाऱ्या विचारांचं दर्पण आहे. गडकरी यांनी पुस्तकाच्या नावाशी सुसंगत अशा पातळीवर जागतिक घडामोडींवर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, जगभरात युद्धाचं जे वातावरण आहे, त्यावर जागतिक चर्चासत्रांची गरज आहे. भारताने पुढाकार घेत जागतिक स्तरावर अहिंसेचा अजेंडा पुन्हा मांडावा. जगाची दिशा आपणच ठरवू शकतो, विनाशाकडे की विकासाकडे.
विवेकशील मध्यस्थीची गरज.
नितीन गडकरींचं हे वक्तव्य केवळ राजकीय नाही, तर ते एका अंतर्बंधाने भरलेल्या विवेकशील नागरिकाचं भाष्य आहे. युद्धाच्या या उंबरठ्यावर उभं असलेलं जग आता मार्गदर्शन शोधत आहे की, भारताची भूमिका शांततेचा दीप घेऊन अंध:कार दूर करणारी असावी, असाच त्यांचा स्पष्ट संदेश आहे. नागपूरच्या व्यासपीठावरून उच्चारलेले हे शब्द केवळ इशारे नव्हते. ते भविष्याची चाहूल देणारे होते. जगाने ऐकावं, विचार करावा आणि युद्धाऐवजी संवाद, हत्याऐवजी सहअस्तित्व, आणि घाताऐवजी घनिष्ठतेचा मार्ग स्वीकारावा, हेच गडकरींच्या भाषणाचं खऱ्या अर्थाने ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ सार्थक होतं.