
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची शिर्डी येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संवाद साधला.
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून यश दिले आहे. या यशाच्या माध्यमातून शिवशाही स्थापन करण्याची जबाबदारी महायुतीवर आली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पूर्ण करू या, असे आवाहन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शिर्डी येथे आयोजित भाजपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. युद्ध संपलेलं आहे, विजय झालेला आहे, मात्र, या विजयाने स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली असल्याचे गडकरी म्हणाले. विदर्भातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पण ज्यांनी त्यांचा पराभव केला ते कोणाच्या लक्षात नाहीत, असे गडकरी म्हणाले.
गावे ओस पडू लागली आहेत. लोक शहराकडे येत आहेत. गावातील स्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे स्मार्ट शहरच नाहीतर स्मार्ट व्हिलेज देखील तयार झालं पाहिजे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हीच शिवशाही महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे. ही जबाबादारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाची आहे, आमदारांची आहे, सर्व जनतेची असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

Devendra Fadnavis यांचाही संवाद
काँग्रेस राष्ट्रवादीने केलं नाही, ते आम्हाला करायचं आहे असे गडकरी म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणुन गडचिरोलीची जबाबदारी घेतली आहे. गडचिरोलीत अनेकजण नक्षलवाद सोडून नोकरी करत आहेत. पुढील पाच वर्षांत गडचिरोली सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा जिल्हा असेल असेही गडकरी म्हणाले.
भाजपचे महाअधिवेशन (BJP Maha Adhiveshan) साईंच्या शिर्डीत सुरू झाले. महाअधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी झालेत. अधिवेशनाची ‘श्रध्दा, सबुरी अन् भाजपची महाभरारी’ अशी टॅग लाईन आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रात काही ठिकाणी सभा घेतल्या. त्यात त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक हैं तो सेफ है’चा नारा दिला होता. या दोन्ही घोषणांची निवडणुकीत जोरदार चर्चा रंगली होती. आता आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. लवकरच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीचे शिर्डीतील महाअधिवेशन महत्वपूर्ण मानले जात आहे. या अधिवेशनामध्ये आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरेल, असे सांगितले जात आहे. सध्या भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानातून भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे.