
शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचा कणा आहे. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीचा नाही, तर संपूर्ण कुटुंबाचा आणि समाजाचा विकास साधता येतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात नागपुरातील अंजुमन इस्लाम संस्थेला अभियांत्रिकी महाविद्यालय दिल्याचा उल्लेख करत, “मुस्लिम समाजातील युवकांना शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. घरातील एक जण शिक्षित झाला तर तो संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन जातो. त्यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच सर्वात मोठा आधार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले. नागपुरात आयोजित सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या औषध निर्माण शास्त्राच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत म्हटले, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. त्याचा जो प्राशन करेल तो गर्जना करेल.” समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणाच्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे आवाहन गडकरी यांनी केले.
Mahayuti : लाडक्या बहिणींसाठी निधीमध्ये कपात अन् शिवसेना नेते संतापात
ज्ञानाचे महत्त्व
गडकरी यांनी विद्यमान सामाजिक परिस्थितीचा उल्लेख करत सांगितले की, मुसलमानांनी दिवसभरात एक नाही, तर शंभर वेळा नमाज अदा केला, तरी जर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात केले नाही, तर त्यांचे भविष्य काय असेल? असे स्पष्ट करत त्यांनी विज्ञान व तंत्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत गडकरींनी सांगितले की, “डॉ. कलाम यांनी आपल्या संशोधन कार्यामुळे जगभर प्रसिद्धी मिळवली. जात, धर्म, पंथ किंवा लिंग यामुळे व्यक्ती मोठी होत नाही, तर ज्ञान आणि कौशल्याच्या जोरावरच ती यशस्वी ठरते. मुस्लिम समाजातील तरुणांनी आधुनिक शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे गडकरी यांनी नमूद केले.
रोजगार संधी
नागपूर फार्मास्युटिकल उद्योगाच्या केंद्रस्थानी असून, येथे मोठ्या प्रमाणावर औषध निर्माण उद्योग वाढत आहे. या उद्योगाच्या विकासात फार्मसीच्या विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर गडकरी यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानासोबतच उद्यमशीलतेला महत्त्व दिल्यास रोजगारनिर्मिती होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल.”
पदवी मिळवणे म्हणजे केवळ शिक्षण पूर्ण करणे नव्हे. तर उद्यमशीलतेच्या दिशेने एक पाऊल टाकणे आहे. उद्योग उभारल्यास त्यातून रोजगार निर्माण होतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधला जातो, असा संदेश नितीन गडकरी यांनी दिला.
नोकरी देणारे बना
गडकरी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत सांगितले की, नोकरी मिळवण्याचा विचार न करता, नोकरी देणारे बना. देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या तरुण उद्योजकांची आज गरज आहे. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार करा, नव्या कल्पनांना चालना द्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावा.
नागपुरातील मुस्लिम युवकांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय देऊन गडकरी यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना दिली आहे. शिक्षण, विज्ञान, उद्योजकता आणि समाजाच्या विकासाला महत्त्व देत त्यांनी युवकांना प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्या पिढीला शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होणार आहेत.