
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विदर्भातील दुर्गम भागात तीस हजारपेक्षा विद्यार्थी एकलव्य एकशिक्षकी शाळांमधून शिक्षण घेत आहेत.
जंगल, डोंगर, दुर्गम खेडी आणि सामाजिक दुर्लक्ष यांच्या छायेखाली वाढणाऱ्या विदर्भातील हजारो मुलांच्या नशिबात आता शिक्षणाची नवी पहाट फुलते आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून एकलव्य एकशिक्षकी शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत विदर्भात 30 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या एकल शाळांमधून केवळ पुस्तकांचे धडे नाही, तर जीवनाचे धडेही दिले जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 28 वर्षे हे उपक्रमी सुरु आहे.

गडकरींच्या या उपक्रमात, आता पुढील दोन वर्षांत दीड लाख शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. उपक्रमाचा प्रकाशवंत ठरले आहेत प्रशांत बोपर्डीकर, जे गेली 25 वर्षे आयुष्य या शाळांना अर्पण करत आहेत. लवकरच नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. हे केवळ सन्मानाचे क्षण नसून, एका अविरत तपस्येची पावती आहे. गोंदियातील आमगावसारख्या लहान गावातून उदयास आलेले लक्ष्मणराव मानकर यांनी स्वतःचे शिक्षण अपूर्ण राहिल्यानंतरही देशसेवेचे व्रत घेतले.
नवा संकल्प
मानकर यांच्या निधनानंतर सुरू झालेला हा शिक्षण प्रवास आता वटवृक्ष बनला आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ अशा आठ जिल्ह्यांमध्ये 1 हजार 35 एकल शाळा कार्यरत आहेत. संपूर्ण शाळांमधून 30 हजार 382 विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. प्रत्येक शाळेत एकच शिक्षक, पण त्यांचं योगदान हजार शिक्षकांइतकं मोलाचं ठरतं आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 340 शाळा असून, 10 हजार 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
गोंदियात 160 शाळांमधून 5 हजार 588 विद्यार्थी, तर अमरावतीच्या दुर्गम मेळघाट भागात 180 शाळांमधून 6 हजार 68 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांतूनही हजारो विद्यार्थी शिक्षणात रमले आहेत. या संपूर्ण उपक्रमासाठी 134 कार्यकर्ते सतत प्रवास करत शाळा आणि शिक्षकांच्या अडचणी सोडवतात. ही फक्त सामाजिक सेवा नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची नवी दिशा आहे.
शिक्षणाचा विस्तार
विदर्भाच्या दुर्गम भागांतून सुरू झालेल्या कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या शिक्षणयात्रेने आता महाराष्ट्रभर झेप घेण्याचा निर्धार केला आहे. निर्धाराच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. गेल्या 29 वर्षांत संस्थेने समाज घडवण्याच्या दिशेने घेतलेली पावलं आज पथदर्शी ठरली आहेत. ही केवळ शाळांची गोष्ट नाही, तर एका विचारांची चळवळ आहे. ज्यात नितीन गडकरी यांनी सक्रिय सहभाग दिला आहे.
विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले हे कार्य आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्याचा गडकरी यांचा संकल्प आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या 30 हजार मुलांपर्यंत हे कार्य पोहोचले असले, तरी त्यांचे स्वप्न आहे. पुढील टप्प्यात एक लाख गरजू विद्यार्थ्यांना या ज्ञानयात्रेत सामावून घेण्याचे.