महाराष्ट्र

Fuel Controversy : नितीन गडकरी यांच्या विरुद्ध रचला जातोय ‘पेड कॅम्पेन’चा कट

Nitin Gadkari : ई-20 इंधनाचा विरोध म्हणजे पेट्रोल लॉबीचा सापळा

Post View : 46

Author

राज्यात सध्या E20 पेट्रोलवरील सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवांवर तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे.

सध्या देशभरात एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे E20 पेट्रोल. सोशल मीडियावर या नव्या इंधनावरुन वादळ उठलंय. काही जण E20 याचे कौतुक करतायत, तर काहीजण त्याला नावं ठेवतायत. यामुळे सामान्य वाहनचालकांचा गोंधळ उडालाय. आता नेमकं काय करायचं? हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळणाऱ्या या नव्या इंधनावरुन सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असताना, केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या सगळ्या गदारोळाला एक वेगळेच वळण दिले आहे. हा सगळा प्रकार म्हणजे श्रीमंत आणि बलाढ्य पेट्रोल लॉबीचा प्रोपेगेंडा आहे, असा थेट आरोप त्यांनी केलाय. ‘माझ्या विरुद्ध एक पेड कॅम्पेन चालवली जातेय,’ असं स्फोटक वक्तव्य गडकरींनी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनच्या (FADA) ऑटो रिटेल कॉन्क्लेवमध्ये केले.

E20 इंधन म्हणजे 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण. सरकार याला हरित ऊर्जेच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल मानते. पण सोशल मीडियावर काही युझर्स दावा करतायत की, E20 मुळे वाहनांचे मायलेज कमी होतंय आणि इंजिनवरही परिणाम होतो. या सगळ्या गोंधळात गडकरींनी ठामपणे सांगितले, ही टीका तांत्रिक समस्यांमुळे नाही, तर पेट्रोल लॉबीच्या हातातले हत्यार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, E20 इंधन भारताला ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. प्रदूषण कमी करण्यातही मदत करणार आहे. गडकरींनी यावेळी पेट्रोल लॉबीच्या डावपेचांवर प्रकाश टाकला. प्रत्येक क्षेत्रात लॉबी असते, अगदी तुमच्यामध्ये सुद्धा, असं म्हणत त्यांनी उपस्थितांना चिमटा काढला. पण त्यांचा मुख्य रोख होता तो सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर.

Devendra Fadnavis : ओबीसी आरक्षणावर कुठलाही आघात नाही

सेमीकंडक्टर स्वावलंबनाची दिशा

E20 मुळे मायलेजवर परिणाम होतो, इंजिन खराब होतं, या सगळ्या गोष्टी वाढवून-चढवून सांगितल्या जातात, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयानेही स्पष्ट केलं. मंत्रालयाचा असा दावा आहे की, E20 वरुन पसरवला जाणारा गोंधळ हा भारताला मागे खेचण्याचा डाव आहे. E-0 कडे परत जाणे म्हणजे भूतकाळात अडकणे, असे मंत्रालयाचे म्हणणे आहे. याचवेळी गडकरींनी भारताच्या हरित भविष्याचा एक रोडमॅपही मांडला. ते म्हणाले, आम्ही नव्या बॅटरी तंत्रज्ञानावर काम करतोय. स्टार्टअप्स सोडियम आयन, लिथियम आयन, जिंक आयन आणि एल्युमिनियम आयन बॅटरीवर संशोधन करतायत. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांच्या स्क्रॅपिंगमधून रेयर अर्थ मेटल्स आणि इतर धातू काढण्याची प्रक्रियाही सुरू आहे. यामुळे भारताला कच्च्या मालाच्या बाबतीत स्वावलंबी बनण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गडकरींनी यावेळी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. काही वर्षांपूर्वी भारत सेमीकंडक्टर चिप्ससाठी पूर्णपणे चीनवर अवलंबून होता. यामुळे ऑटोमोबाइल उद्योगाला मोठा फटका बसला. पण आता भारतात चिप्सचे उत्पादन सुरू झाला आहे, असे ते अभिमानाने म्हणाले. याच आत्मविश्वासाने त्यांनी भविष्याचा वेध घेतला. लवकरच इंधन आणि बॅटरी क्षेत्रातही भारत स्वावलंबी बनेल, असा दावा त्यांनी केला. यासोबतच त्यांनी ऑटोमोबाइल उद्योगाच्या प्रचंड क्षमतेवरही प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खूप मोठी आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांची मागणी सध्या तरी कमी होणार नाही. दरवर्षी 15-20 टक्के उत्पादन वाढ होतेय. पण पर्यायी इंधन आणि नवं तंत्रज्ञान हळूहळू आपले स्थान पक्के करेल, असं गडकरींनी ठामपणे सांगितले.

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!