
नागपूरमध्ये गडकरींचा थेट टोला, दगडफेक करणारेच आता भाजपमध्ये. रामदास आंबटकरांच्या कार्याची आठवण करत संघर्षमय काळाची दिली आठवण.
नागपूरच्या राजकारणात गाजलेल्या श्रद्धांजली सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावनांनी भारावलेला पण तितकाच स्पष्ट आणि थेट संदेश दिला. पूर्वी आमच्या घरावर दगड मारणारेच आता भाजपमध्ये आले आहेत, या एकाच वाक्यात त्यांनी राजकीय वर्तनातील बदलांवर प्रकाश टाकला. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये डॉ. रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना त्यांनी संघर्षाचे दिवस आठवले. त्या काळातील कार्यकर्त्यांच्या निष्ठेची आठवण करून दिली.
गडकरींच्या भावनांना व्यासपीठावर उपस्थित असलेले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संघाचे अ. भा. प्रचारक सुनील आंबेकर यांच्यासह डॉ. आंबटकर यांचे कुटुंबीय साक्षी होते. त्या वेळी गडकरींचा आवाज जरी संयत असला तरी त्यामागची जळजळीत वास्तव चित्रित करणारा होता.

कार्यकर्ते धैर्याने उभे
गडकरी म्हणाले, पूर्वी भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांवर, आमच्या घरांवर दगडफेक झाली. माझ्या घरावरही शिवीगाळ करत दगड मारले गेले. पण त्याच वेळी डॉ. रामदास आंबटकर यांच्यासारखे कार्यकर्ते धैर्याने उभे राहिले. त्यांनी अनुकूल नसलेल्या परिस्थितीत संघटनेचा झेंडा खंबीरपणे उचलला. गडकरी यांच्या या आठवणींमुळे अनेकांचे डोळे पाणावले. त्यांनी नमूद केलं की, आज जे विजयाचे दिवस भाजपला लाभले आहेत, त्यामागे त्या काळात जीव ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे.
गडकरी यांनी डॉ. आंबटकर यांच्या योगदानाचे स्मरण करताना सांगितले की, समाजासाठी कार्य करणे हे एक व्रत मानणाऱ्या आंबटकरांनी विद्यार्थी परिषद, संघ व भाजपमध्ये अटळ निष्ठा जपत कार्य केले. निवडणुकीत देखील ते जिंकले कारण त्यांच्यासाठी कार्यकर्ते जीव तोडून मैदानात उतरले होते. त्यांच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचे त्यांनी कौतुक केले. कधीही तत्वांशी तडजोड न करता संपूर्ण कुटुंब संघाच्या विचारांशी बांधिल राहिले. हीच त्यांची खरी ताकद होती.
अचूक संघटक
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंबटकरांच्या बहुपर्यायी योगदानाचे वर्णन करताना सांगितले की, ते उत्तम गीतकार होते. त्यांची गीते थेट हृदयाला भिडणारी होती. संघटन कौशल्यात ते पारंगत होते. विद्यार्थी परिषदेपासून भाजपपर्यंत लोकांना जोडण्यात त्यांनी मोलाचे काम केले. त्यांचे हे कौशल्य आज अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक सुनील आंबेकर यांनी सांगितले की, डॉ. आंबटकर यांच्याकडून संघटनेत जीव ओतून काम कसे करावे हे शिकावे. त्यांच्या कुटुंबात संघ संस्कारांची परंपरा होती. ती आजही त्यांच्या पुढील पिढीत टिकून आहे.