
बुलढाणा जिल्ह्यात जलजीवन मिशनची 406 कामे अचानक थांबली आहेत. नळजोडण्या असूनही पाण्याचा थेंबही न दिसण्यामागे गंभीर कारण दडले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत 1 हजार 256 कामे 2024 पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सध्याची स्थिती पाहता ही महत्त्वाकांक्षी योजना अडचणीत सापडली आहे. जिल्ह्यातील तब्बल 406 पाणीपुरवठा योजनेची कामे निधीअभावी थांबली आहे. कंत्राटदारांनी काम बंद केल्याने ग्रामीण भागातील नळवाहिन्यांमधून पाणीपुरवठा बंद पडण्याची वेळ आली आहे. शासनाकडून अद्याप 125 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याने पुढील कामासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.
‘हर घर नळ से जल’ या संकल्पनेला 2019 साली मूर्त स्वरूप देण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन मिशन सुरू केले. प्रत्येक ग्रामीण नागरिकाला स्वच्छ पाणी पुरवण्याचा हेतू या योजनेमागे होता. या योजनेत केंद्र व राज्य शासनाचा 50:50 असा आर्थिक सहभाग असूनही, 2024 अखेरपर्यंत अपेक्षित निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली अनेक पाणी योजना रखडल्या आहेत.

Navin Jindal : राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? भाजप नेत्याचा हल्ला
निधीअभावी ठप्प विकास
बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत ही कामे थांबली असून देऊळगाव राजा 31, सिंदखेड राजा 70, चिखली 62, नांदुरा 17, शेगाव 3, खामगाव 76, लोणार 59, संग्रामपूर 1, बुलढाणा 5, मोताळा 3 आणि मेहकर तालुक्यात 79 अशा कामांना मोठा फटका बसला आहे. या तालुक्यांतील अनेक गावे आजही नळजोडणीविना पाण्यासाठी वणवण करत आहेत.
योजनेअंतर्गत विहिरी बांधणे, टाक्या उभारणे, नळजोडणी करणे अशी कामे नियोजित होती. मात्र निधी मिळत नसल्याने कंत्राटदारांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, या योजनेच्या अंतर्गत अनेक ठिकाणी जुनी कामेच पुन्हा रंगरंगोटी करून दाखवण्याचे प्रकार समोर येत आहेत. पूर्वी महाजल किंवा जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या पाण्याच्या टाक्या व विहिरींना जलजीवन योजनेचा मुलामा देत निधीचा अपव्यय करण्याचा प्रकारही या ठिकाणी बघायला मिळतो आहे.
दर्जाहीनतेची सावली
योजनेची अंमलबजावणी सुरू असताना अनेक ठिकाणी नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत तक्रारी केल्या. टाक्यांच्या बांधकामातील निकृष्ट दर्जा, पाईपलाइनमध्ये गळती, नळजोडणीची अर्धवट स्थिती आदी बाबीमुळे या योजनेवर समाजात नाराजीचा सूर उमटू लागला होता. काही ठिकाणी नळजोडणी असूनही पाणीच येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडल्याने अनेक गावांमध्ये खोदकाम करून रस्ते उखडले गेले, जलवाहिन्या अर्धवट टाकल्या गेल्या. त्यानंतर कोणतीही देखभाल केली गेली नाही. परिणामी पाऊस आणि मातीने भरलेले खड्डे गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहेत.
प्रश्न कायम
406 कामे पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असताना, कार्यकारी अभियंता अनिल चव्हाण यांनी संबंधित कंत्राटदारांना नोटीस बजावल्या. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने त्यांच्या देयकांचे भुगतान करण्यात आलेले नाही. तरीसुद्धा काही ठिकाणी कामे सुरू झाली असली, तरीही शंभर कोटींपेक्षा अधिक निधी अद्यापही अप्राप्त आहे.
ही संपूर्ण परिस्थिती पाहता, ग्रामीण भागातील नागरिकांना ‘हर घर नळ से जल’ या स्वप्नाचा लाभ मिळणे फार कठीण झाले आहे. जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या योजनेला निधीअभावी आलेला खिंडार हा शासनाच्या नियोजनशून्यतेचा आणि निधी व्यवस्थापनातील कुचराईचा स्पष्ट पुरावा ठरत आहे.