
नागपूर जिल्ह्यात अपघाती मृत्यूंचे वाढते प्रमाण गंभीर समस्या बनली आहे. रस्ते अपघातांबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. आता त्यांच्याच गृह जिल्ह्यातून धक्कादायक माहिती पुढं आली आहे.
रस्त्यांवर होणारे अपघात अन् त्यात जाणाऱ्या जीवांबद्दल ‘हायवे मॅन’ नितीन गडकरी वारंवार चिंता व्यक्त करीत असतात. आता त्यांच्याच नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या अपघाती मृत्यूंच्या प्रमाणाची चिंता सर्वांना सतावत आहे. नागपूर ग्रामीण भागात 2024 मधील पहिल्या 10 महिन्यांमध्ये झालेल्या अपघाती मृत्युनं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अपघातांची संख्या वाढली. त्यामुळं आता रस्त्यांची पुनर्रचना अन् उपाययोजना गरजेची झाली आहे.
वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी यासंदर्भातील आकडेवारी दिली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या काळात नागपूर शहरात 1 हजार 41 अपघात घडले. या अपघातांमध्ये 286 लोकांचा मृत्यू झाला. याच कालावधीत नागपूर ग्रामीण भागात 738 अपघात झालेत. ग्रामीण अपघातांमध्ये 343 नागरिकांचा मृत्यू झाला. या आकडेवारीवर नजर टाकल्यास ग्रामीण भागातील अपघातांची समस्या बिकट होत असल्याचं दिसत आहे.

व्यापक Treatment गरजेची
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून अपघातांची आकडेवारी गोळा केली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अपघात चिंताजनक व जीवघेणे ठरत आहेत. मृत्युचे प्रमाण ग्रामीण भागात बरेच जास्त आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील अपघात नियंत्रणाच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील अपघातांची विविध कारणं समोर आली आहेत. मुख्य कारणं वाहनाचा वेग आहे. धोकादायकपणे वाहन चालविल्यानं अनेक अपघात घडले आहेत. रॉंग साइड वाहन चालविल्यामुळं घडलेल्या अपघातांची संख्या त्या खालोखाल आहे.
वाहनातील बिघाड, रस्त्यांवरील खड्डे, खराब रस्ते आणि वाहतूक सिग्नल्स नसणे यामुळंही अपघात घडले आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळं अपघातांचे प्रमाण सतत वाढतेच आहे. खराब रस्त्यांमुळं वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी दुहेरी रस्ते आहेत. त्यामुळं ‘ओव्हरटेक’ करतानाही अनेकांना अपघात घडत आहेत.
अनेकांनी तोडले Traffic Rule
वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्यानंही अपघात घडल्याची संख्या बरीच आहे. अचानक ब्रेक लावल्यामुळं पाठीमागून वाहन धडकल्यानंही जीवघेणे अपघात घडले आहेत. नागपूर जिल्ह्यात झपाट्यानं विकास झाला आहे. अद्यापही विकास सुरूच आहे. त्यामुळं वाहनांची संख्या वाढतीच राहणार आहे. त्यातुलनेत वाहतूक सुरळीत चालण्यासाठी यंत्रणा नसल्याचं दिसत आहे. नागपूर शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांचं रुंदीकरण केलं आहे. शहरातील जवळपास सर्वच अंतर्गत रस्ते प्रशस्त झाले आहेत.
ग्रामीण भागात मात्र अद्यापही हे प्रमाण कमी आहे. त्यामुळं अपघातांचा आकडा वाढताच आहे. पोलिस आणि सामाजिक संस्थांमार्फत वाहन चालकांसाठी प्रशिक्षणासाठी गरजेचे झाले आहे. राष्ट्रीय आणि राज्य रस्ते विकास महामंडळानं ब्लॅक स्पॉट्स शोधणंही गरजेचं आहे. खराब रस्त्यांचा दर्जाही सुधारणे गरजेचं झालं आहे. वाहनांची स्थिती तपासणेही महत्वाचं आहे. बिघडलेल्या किंवा खराब वाहनांमळं अपघात घडतात. याशिवाय नागपूर जिल्ह्यात स्मार्ट सिग्नलही गरजेचे झाले आहेत.