
राज्यातील विद्यापीठांमध्ये देखील राजकीय संघटनांचं वर्चस्व निर्माण झालं आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात ‘नुटा’नं वर्चस्व प्रस्थापित केलं.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटाच्या पदाधिकाऱ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. विद्यापीठातील विविध विषयाच्या अभ्यास मंडळांसाठी निवडणूक घेण्यता आली. अकॅडमी कौन्सिल म्हणजेच विद्या परिषदेच्या प्राधिकरणावरही निवड प्रक्रिया पार पडली. यात नुटाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह अमरावती विद्यापीठातही नुटाचं वर्चस्व अबाधित राहिलं आहे.
विद्या परिषदेत आंतरविद्या शाखेमधून डॉ. संजय देशमुख यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डॉ. आशिष राऊत यांची निवड करण्यात आली. देशमुख हे अकोल्याच्या शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. डॉ. जीवन पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ. गशेध मालटे यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड कला आणि मानव्यविद्या शाखेमधून करण्यात आली. डॉ. मालटे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत.

निवडणुकीच्या मुद्द्यावरून वाघमारे Raju Karemore यांना धरायला लावणार चरण
आणखी सदस्यांची निवड
भौतिकशास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळातून डॉ. अजय लाड यांचं पद रिक्त झालं होतं. त्यांच्या जागेवर डॉ. सुयोग मानकर यांची निवड करण्यात आली. डॉ. मानकर हे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवाडा तालुक्यात असलेल्या केळापूर येथील शिवाजीराव मोघे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात कार्यरत आहेत. समाजकार्य अभ्यास मंडळामध्ये रिक्त झालेल्या जागेवर डॉ.अनिल देशमुख यांची निवड करण्यात आली. यवतमाळच्या महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयात ते कार्यरत आहेत. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुटा संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ. प्रवीण रघुवंशी यांचे नेतृत्वाला यशाचे श्रेय दिले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर नुटा संघटनेनं 2022 मध्ये निवडणुकीत वर्चस्व स्थापित केलं होतं. सिनेट आणि विद्या शाखेच्या निवडणुकीमध्ये 80 टक्के जागा नुटानं प्राप्त केल्या होत्या. त्यामुळं पुन्हा एकदा नुटाचं निर्विवाद वर्चस्व अधोरेखित झालं होतं. अलीकडच्या काळात अमरावती विद्यापीठात नुटाच्या यशाचा आलेख सातत्याने वाढत आहे.
नुटा संघटनेचे सिनेट सदस्य डॉ. प्रशांत विघे, डॉ. सुभाष गावंडे, प्राचार्य डॉ. देवेंद गावंडे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. नितीन टाले, डॉ. नितीन चांगले, डॉ. रवींद्र मुंद्रे, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, डॉ. संतोष बनसोड, कैलास चव्हाण, अमोल देशमुख आदी यावेही उपस्थित होते. डॉ. अविनाश बोर्डे, डॉ. महेंद्र मेटे, डॉ. सावन देशमुख यांनी निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे कौतुक केले.