
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार व अमोल मिटकरी यांच्यावर निधीअडवणुकीचा आरोप करत सडकून टीका केली होती. त्यावर आता आमदार मिटकरींनी हाकेंच्या पात्रतेवर सवाल उपस्थित केला आहे.
राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे झगडे काही नवीन नाहीत, पण सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. हाके यांच्या मते, अजित पवार हे पोल्ट्री फार्म व्यवसायात व्यस्त असून त्यांनी ओबीसींच्या निधीचे वाटप अडवून ठेवलं आहे. यावरून ते सरकारला थेट लक्ष्य करत आहेत. मात्र, हाकेंनी केलेली ही टीका अगदी एवढी सोपी जाणार नाही, कारण राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनीही लक्ष्मण हाकेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लक्ष्मण हाकेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाकेंची निवडणूक कामगिरी आणि पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटलं की, लक्ष्मण हाके, तुम्ही ओबीसी नेते कसे? आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत तुम्ही तुमचं डिपॉझिट गमवलंय. खास करून 2014 सांगोला निवडणुकीत हाकेंनी एका वकिलाकडून पन्नास हजार रुपये घेतल्याचा आरोप मिटकरींनी जोरदारपणे केला आहे. त्यांनी लक्ष्मण हाकेंना त्यांच्या ‘औकात’ पाहण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतरच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोलण्याचं ठरवावं, असा टोला लगावला.

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या तोंडातून निघालं राजीनाम्याचं वादळ
निवडणूक अपयश लक्षात
निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील टीका केली होती. यावर मिटकरींनी पडळकरांना महाविकास आघाडीचे प्रवक्ते नसल्याचा सल्ला देत, तुम्हाला महाविकास आघाडीकडून काही मिळालं का? असं म्हणत सुद्धा टोला लगावला.मिटकरी म्हणाले, लक्ष्मण हाकेला मी सल्ला देतो, आपल्या निवडणुकीमधला निकाल पाहा. गाडी तुम्ही स्वतः घेतली की जनतेने दिली, हे स्पष्ट करा. 2014 मध्ये तुम्हाला फक्त 527 मतं मिळाली होती. त्यांनी अजित पवारांशी तुलना करताना लक्ष्मण हाकेंना त्यांची ‘औकात’ पहावी असं सांगितलं.
मराठा-ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके यांचा मोठा वाटा आहे, असंही त्यांनी म्हटलं. मिटकरी पुढे म्हणाले, मी आमदार झाल्यावर माझ्या गावात ग्रामपंचायत निवडून आणली. जरी जिल्हा परिषदेत पराभूत झालो तरी सन्मानजनक मते मिळाली. पण लक्ष्मण हाके यांना आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीमध्ये साडेसहा हजारही मतं मिळाली नाहीत. यावरून त्यांनी लक्ष्मण हाकेंना इशारा दिला की, जर लक्ष्मण हाके भुंकत राहिले तर मी त्याच्याविरुद्ध नक्कीच बोलणार आहे. त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र सुद्धा ठेवणार नाही. संत म्हणतात, व्हावे अधमाशी अधम, हे लक्षात ठेव, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले.