राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी मंडल यात्रा आयोजित केली. ज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
महाराष्ट्राचे राजकारणात सध्या एक नवीन वळण घेताना दिसत आहे. महाविकास आघाडीला मात देत महायुती सरकार सत्तेवर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला विधानसभा निवडणुकीत काही मोठे धक्के बसले आहेत. अनेक प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडला, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावात घट झाली आहे. तथापी, या पराजयाने शरद पवार यांची पार्टी थांबलेली नाही. आता ते एक नवीन रणनीती रचत आहेत. विदर्भातील भाजपचा गढ मानला जाणारा भंडारा जिल्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक महत्त्वाची रणभूमी बनला आहे. येथील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि ओबीसी समाजाच्या आवाजासाठी एक महत्त्वाची धडक मोर्चा यात्रा काढण्यात आली आहे.
13 ऑगस्ट 2025 रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार आणि अन्य महत्त्वाचे नेते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस गटाने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सशक्त आवाज उठवला आहे. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे करत आहेत. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार चरण वाघमारे यांचा समावेश आहे.
Vijay Wadettiwar : मुस्लिमांना सौगात भारी हिंदूंची रिकामी थाळी
बैलगाडीने दाखवले शेतकऱ्यांचे दुःख
चरण वाघमारे यांनी या मोर्चाच्या माध्यमातून ओबीसी समाजासाठी संघर्ष सुरू केला आहे. त्यांच्या नेतृत्वात ही मंडल यात्रा भंडारा जिल्ह्यात जोरदार धडक मोर्चाचे रूप घेत आहे. जिथे शेतकऱ्यांच्या वेदनांसाठी आवाज बुलंद केला जात आहे. बैलगाडीतून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळालाच पाहिजे, भ्रष्टाचारी कंत्राटदारांवर कारवाई झालीच पाहिजे अश्या आवाजांनी हा धडक मोर्चा काढण्यात आला. ज्यात अनेक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शरद पवार यांच्या नेतृत्वात आयोजित केलेली मंडल यात्रा म्हणजे केवळ शेतकऱ्यांचीच लढाई नाही, तर ती ओबीसी समाजाच्या अधिकारांसाठी एक मोठा संघर्ष ठरत आहे.
यात्रेत अनेक नेते उपस्थित असून, त्यांनी बैलगाडीतून शेतकऱ्यांची स्थिती दाखवण्याची महत्त्वाची भूमिका राबवली आहे. शरद पवार यांनी 1994 मध्ये मंडल आयोग लागू केले होते. त्या निर्णयाची आठवण देण्यासाठी हे मोर्चे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याला एक मोठा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक संघर्ष मानले आहे. कारण मंडल आयोगाने भारतात एक मोठा परिवर्तन घडवून आणला. आजही ओबीसी समाजाला त्याच्या अधिकारांसाठी संघर्ष करत राहावा लागतो. भंडारा जिल्ह्यात मंडल यात्रा या संघर्षाचे प्रतीक बनली आहे. याचा राजकीय प्रभाव येत्या काळात अधिक गडद होईल.
