रात्रीचा रस्ता शांत असतो, पण धोका अधिक आणि म्हणूनच आम्ही तेव्हा मैदानात असतो. हे शब्द आहेत नागपूर ट्रॅफिक विभागाचे नवे DCP IPS लोहित मतानी यांचे, जे सध्या शिस्तीची नवी परिभाषा लिहत आहेत.
नाव जितकं साधं, काम तितकंच धारदार. 13 जुलै 2025 रोजी रात्री, नागपूर शहरात 5 महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये रात्री 11 ते पहाटे 2 दरम्यान 35 मद्यधुंद वाहनचालकांना पकडण्यात आलं. पण ही कारवाई केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. ही एक मनात थेट जाऊन घाव करणारी मोहिम आहे. विशेष म्हणजे, या कारवाईचं नेतृत्व स्वतः IPS लोहित मतानी यांनी थेट रस्त्यावर उभं राहून केलं.
मतानी यांच्या आदेशाखाली काम करणाऱ्या प्रत्येक पथकाला त्यांनी फक्त निर्देश दिले नाहीत, तर ते स्वतः सिग्नलच्या अंधाऱ्या छायेत उभे होते, वाहन थांबवत होते, लोकांशी संवाद साधत होते आणि ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करत होते. एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याला रस्त्यावर काम करताना पाहून अनेक नागपूरकर अवाक झाले. पण मतानींसाठी हे सामान्य होतं, कारण त्यांच्या मते, रस्त्याची शिस्त ही केवळ ट्रॅफिक पोलीसांची नाही, ती एक सामाजिक जबाबदारी आहे.
अनेकांना शिकविला धडा
‘ऑपरेशन यू टर्न’ या नावामागे फक्त वाहतूक नियम मोडणाऱ्यांना थांबवण्याचा हेतू नव्हता, तर माणसाच्या मानसिकतेत वळण घालण्याचा प्रयत्न होता. नागपूरसारख्या शहरात दररोज हजारो गाड्या रात्री उशिरा धावत असतात. त्यातील अनेक चालक मद्यधुंद अवस्थेत, विना परवाना ड्रायव्हिंग, किंवा नियम मोडत असतात. यामुळे होणारे अपघात हे आकड्यांमध्ये नाही, तर कुटुंबांमध्ये मरण घेऊन येतात.
लोहित मतानींनी यासाठी धोरणात फक्त ‘दंड’ ठेवलेला नाही, तर जागृतीचा झणझणीत डोस ठेवलेला आहे. कारवाई दरम्यान, प्रत्येक अडवलेल्या वाहनचालकाला केवळ कारवाई नव्हे, तर त्याच्या कृतीचे परिणाम पटवून देणं, आणि शिस्तीची जाणीव करून देणं, हे मतानींचं प्राथमिक उद्दिष्ट होतं. या मोहिमेचा दुसरा विशेष पैलू म्हणजे डिजिटल पुराव्यावर आधारित कारवाई. प्रत्येक वाहनचालकाची ब्रेथ टेस्ट, त्याचा चेहरा, वाहन क्रमांक आणि संपूर्ण माहिती एकाच सिस्टीममध्ये लिंक करून ठेवण्यात आली आहे. केवळ तात्पुरती शिक्षा नाही, तर भविष्यातील सिस्टिमॅटिक निगराणीचा पायाही या कारवाईतून रचण्यात आलाय.
Ravindra Chavan : महायुतीच्या बळावर स्वराज्य संस्थांमध्ये विजयाचा जल्लोष
व्हाट्सॲपवरून थेट पोलिसांपर्यंत
या सगळ्यासोबत, मतानींनी नुकताच सुरू केलेला ‘ट्रॅफिक मित्र’ उपक्रम या कारवाईच्या केंद्रस्थानी होता. या उपक्रमाअंतर्गत नागपूरकर आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ड्रंक अँड ड्राईव्ह, चुकीचं पार्किंग, हेल्मेटशिवाय गाडी चालवणं यासारख्या घटना थेट पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात. ही माहिती विश्वासार्ह असेल, तर कारवाई अवघ्या 10 ते 15 मिनिटांत केली जाते, अशी खात्री मतानींच्या कार्यशैलीमुळे निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, IPS लोहित मतानी यांचं आगमन केवळ प्रशासनात नवे पान उघडणं नव्हे, तर नागपूरच्या रस्त्यांना सुरक्षिततेचा कवच मिळणं आहे. त्यांनी सिग्नल, रस्ता, आणि वाहन यांना शिस्तीची तत्त्वं शिकवण्याचा वसा घेतलाय. पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी घडवलेली चांगली परंपरा आणि नागपूरकरांची सहकार्याची तयारी. या दोन गोष्टींवर विश्वास ठेवून मतानी यांनी एक मिशन हाती घेतलं आहे. ते फक्त DCP नाहीत, ते ‘नियमांचा शिक्षक’ बनले आहेत. त्यांच्या ‘पाठशाळे’त दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना पहिल्याच दिवशी शिक्षा आणि शिकवण दोन्ही मिळत आहे.