
महाविकास आघाडीमध्ये सध्या विरोधी पक्षनेते पदावरून महायुद्ध सुरू आहे. अशात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या पाच मार्चला विरोधी पक्षनेते पदासाठी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती दिली. ‘द लोकहित लाइव्ह’शी त्यांची संवाद साधला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन 3 ते 26 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. योजनांची घोषणा अपेक्षित आहे. अधिवेशनात केवळ अर्थसंकल्पच नव्हे तर विरोधी पक्षनेत्याच्या जागे वरूनही मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत या जागेसाठी मोठा संघर्ष रंगला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपले सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला महाविकास आघाडीमधील अनेक आमदारांनी विरोध आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारांना संधी दिली पाहिजे, असे मत अनेकांनी मांडले आहे. शिवसेनेतून भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत आले आहे. जाधव या पदासाठी योग्य पर्याय ठरू शकतात, असे काहींना वाटते. मात्र काँग्रेसने या पदावर दावा करत विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे केलं आहे.
Maharashtra Budget Session : महायुतीचे ‘कुबेर’ करणार नवी जादू!!
काँग्रेस आग्रही
महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार काँग्रेसकडे असल्याने विरोधी पक्षनेतेपद आपल्यालाच मिळावे, असा काँग्रेसचा ठाम आग्रह आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच असावे, ही आमची भूमिका आहे. आपलीही तशीच इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सपकाळ यांनी ‘द लोकहित लाइव्ह’शी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडी विरोधी बाकांवर स्थिरावली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये यावरून मोठा तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद आहे. आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आपल्यालाच मिळावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र, उद्धव ठाकरे या भूमिकेशी अनेक सहमत नाहीत. त्यांचा आग्रह आदित्य ठाकरे यांना संधी देण्याचा आहे. अर्थात त्यांनी निर्णय शिवसेना आमदारांवर सोडला आहे.
काँग्रेसमधील सर्वांनाच उद्धव ठाकरे यांचा निर्णय मान्य नाही. विरोधी पक्षनेतेपद हे केवळ पक्ष श्रेष्ठींच्या इच्छेवर ठरू नये. अनुभव आणि प्रभावी नेतृत्व असणाऱ्या व्यक्तीकडे मते द्यावं, असे मत काँग्रेसमधील नेत्यांनी व्यक्त केलं आहे. यामुळे पाच मार्चला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन सपकाळ याबाबत म्हणाले की, काँग्रेसचे गटनेते आणि आमदार याबाबत एकत्रितपणे निर्णय घेतली. महाविकास आघाडीमधील अन्य नेतेही या चर्चेत सहभागी होणार आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यासाठी विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी अर्थसंकल्पात कृषी, महिलांची सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, विकास प्रकल्प या क्षेत्रांना अधिक प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. मात्र या मुद्द्यावर विरोधक काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करताना शिवसेना आणि नाना पटोले यांच्यात वाद झाले होते. पटोले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होते. आता काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. नवे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कोणती भूमिका घेतात, याकडं सर्वांचं लक्ष आहे.