महाराष्ट्र

Sanjay Shirsat : मंत्रीपुत्राच्या विकृतीवर गोंधळाचा खटाटोप 

Harrasment : संजय शिरसाट यांच्या मुलावर छळ केल्याचा आरोप 

Author

महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राच्या सावलीत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर अत्याचाराचे गंभीर आरोप उघड झाले आहेत. पीडित महिला न्यायासाठी आक्रोश करत असताना सत्ताधाऱ्यांचे मौन अधिक गूढ ठरत आहे.

सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सुपुत्रावर एका विवाहित महिलेने केलेले गंभीर आरोप सध्या राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठवत आहेत. ‘सत्ताधाऱ्यांच्या घरातच अन्याय’ अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटत आहे. या प्रकरणी संजय शिरसाट यांच्यावर राजीनाम्याची मागणी होत आहे. महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता हा वाद आणखी गडद होत चालला आहे.

2018 मध्ये सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट आणि पीडित महिला यांच्यात जवळीक वाढली. काही दिवसांतच त्यांच्या नात्याने चेंबूर येथील फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांचा टप्पा गाठला. नंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत भावनिक दबाव टाकून लग्नासाठी महिला जबरदस्तीनं तयार केली. विवाहानंतरही त्रास थांबला नाही. महिलेचा गर्भधारणा झाल्यानंतर सिद्धांतने तिचा जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही नोटीसद्वारे करण्यात आला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे, माझे वडील मंत्री आहेत, तुझं काहीही वाकडं करू शकत नाहीस, अशा धमक्या दिल्याचा उल्लेखही आहे.

Chandrapur : भरतीपासून फसवणुकीपर्यंत, आता बोलेल फक्त एसआयटी 

विरोधकांचे स्फोटक आरोप

या प्रकरणावरून संपूर्ण विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून, उद्धव ठाकरे गट, मनसे, एमआयएम आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून संजय शिरसाट यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे म्हणाल्या, वैष्णवी हगवणे, प्रिया फुके आणि आता शिरसाट यांचा मुलगा. महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच आहे. महिला आयोग आता त्या मंत्र्याच्या मुलाची कॉलर पकडणार की नाही? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. मनसे नेत्या शालिनी ठाकरे टीका करीत म्हणाल्या की, अजित दादा हुंड्याची चावी देतात, तर संजय शिरसाट आपल्या मुलाचा छळ लपवतात. सरकार एवढं निलाजरं असेल, हे बघावं लागणं दुर्दैवी आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत म्हटले की, मुलीला धमकावून, ब्लेडने स्वतःला कापण्याच्या नाटकातून लग्न केलं. हे गंभीर आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशाराही दिला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे यांनीही घणाघाती टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांच्या घरातले पुरुषच मुलींवर अत्याचार करत असतील, तर याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का? संजय शिरसाट यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी ही अंधारे यांनी केली.

Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचे कंट्रोल टॉवर अनिल देशमुखांकडे

सरकारवर टीकेची झोड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. दानवे म्हणाले की, गुन्हा गंभीर आहे. राजकीय दबावापोटी कारवाई थांबवणं म्हणजे कायद्याला हरवणं. राजकीय दबावापोटी तक्रारीकडे दुर्लक्ष करून गुन्हा न दाखल करून घेणे हे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. तर सिद्धांत शिरसाट यांचं तिसरं लग्न, त्यानंतर धमकी… महिला आयोग गप्प का? त्या मुलीला तात्काळ न्याय मिळायला हवा, असे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखालील महिला आयोग अजूनही या प्रकरणात गप्प असल्याने, त्यांच्या निष्क्रियतेवरही अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याच्या सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्याच्या घरातील हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने, सरकारची विश्वासार्हता आणि महिला सुरक्षेबाबतची प्रतिमा धोक्यात आली आहे. आता या प्रकरणात कारवाई होईल की नाही? महिला आयोग भूमिका घेईल का आणि संजय शिरसाट यांचा राजीनामा घेतला जाईल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!