पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अजूनही हल्लेखोर बेपत्ता असल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अजित डोवाल यांच्यावर थेट प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मात्र या घटनांवर आता राजकीय घमासान सुरू झाले आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलण्यात आली. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा भारताने केला. हे सर्व फक्त 23 मिनिटांत पार पाडल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्पष्ट केले.
कारवाईनंतर दोन-तीन महिने उलटून गेले तरी त्या हल्ल्याचे हल्लेखोर नक्की गेले कुठे? याच प्रश्नांची उत्तरं विरोधक आता जोरात मागू लागले आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावर थेट पवित्रा घेत अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. पहलगाम हल्ल्याचे हल्लेखोर कोठे आहेत? त्यांच्या पाठीमागे कोण होतं? सीमेपासून इतक्या आत येऊन त्यांनी हल्ला केला, मग परत पाकिस्तानमध्ये माघारी कसे गेले? डोवाल यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच हवीत, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या . त्यांनी हेही विचारले की, जर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्वतःच यावर मौन बाळगणार असतील, तर मग इतरांकडे पुरावे मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना आहे का?
राजकीय दबावात वाढ
तुमच्या अपयशाचे खापर विरोधकांवर फोडून पाकिस्तानसारख्या देशाला आणि परदेशी माध्यमांना तुम्ही आयतं कोलीत देताय का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, डोवाल यांनी IIT मद्रासच्या दीक्षांत समारंभात बोलताना स्पष्ट केले की ऑपरेशन सिंदूर हे एक अचूक आणि नियोजित कारवाई होती. पाकिस्तानमधील ९ ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. कोणत्याही नागरी वस्तींवर हल्ला करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितले. पाकिस्तानने यानंतर दावा केला होता की त्यांनी भारताचं एक लढाऊ विमान पाडलं. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावत स्पष्ट केलं की भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांनी परदेशी मीडियाला थेट आव्हान दिलं की भारताचं नुकसान झाल्याचा एक तरी व्हिज्युअल दाखवा. देशभरात संताप आहे, लोक उत्तरं मागत आहेत. केवळ घोषणा आणि परदेशी मीडियावर बोट दाखवणं पुरेसं नाही, असंही ठाकूर ठामपणे म्हणाल्या. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई केली, हे निश्चित आहे. मात्र अजूनही हल्लेखोरांची माहिती, त्यांचे फोटो, त्यांच्या हालचाली यावर सरकारकडून अधिक माहिती समोर आलेली नाही. त्यामुळेच विरोधकांनी आता हे प्रकरण पुन्हा उकरून काढत अजित डोवाल यांच्यावर राजकीय आणि प्रशासकीय दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.
Sanjay Khodke : रखडलेल्या सिंचनाला नवजीवन देण्यासाठी आमदाराचा संकल्प