
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरमध्ये 2 हजार 200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. असे असतानाच, नागपूर शहरातही गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भारत सरकारच्या ताज्या निर्णयांनंतर नागपूरमध्ये 2 हजार 200 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. उत्तर नागपूर भाग हे या नागरिकांचे मुख्य केंद्र असल्याचे उघड झाले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. भारताने सिंधू नदी पाणी करार रद्द करून पाकिस्तानला जबरदस्त इशारा दिला आहे. त्याचबरोबर, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी नागपूरमध्ये सुरू झाली आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pahalgam Attack : पीओके पंतप्रधानांचे भडक विधान, भारताला थेट धमकी
पोलिसांची शोधमोहीम सुरू
नागपूर पोलिसांनी माहिती दिली की, सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक उत्तर नागपूर परिसरात वास्तव्यास आहेत. यातील बहुतांश नागरिकांचे व्हिसा कालबाह्य झाले आहेत. तरीही ते अनेक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. हे नागरिक नेमके कोणत्या कारणासाठी येथे थांबले आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, याचा सखोल तपास सुरू आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस विभागाने सतर्कता वाढवली आहे. गुप्तचर यंत्रणा, परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय (FRRO), आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत या नागरिकांची ओळख पटवली जात आहे. यामध्ये काही नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनेकजणांनी नातेवाइक असल्याचे भासवून येथे वास्तव्य केले होते.
दहशतवादी हल्ल्यानंतर भारतभरात संतापाची लाट उसळली आहे. सरकारने घेतलेली निर्णायक पावले आणि कठोर आदेश यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरसारख्या शहरात अशा नागरिकांची उपस्थिती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोणत्याही परदेशी नागरिकाने व्हिसा कालावधी संपल्यानंतर भारतात थांबण्यास परवानगी नाही. त्यामुळे नागपूरमध्ये सुरू असलेली ही मोहीम संपूर्ण देशासाठी एक संदेश ठरत आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा टप्पा
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हे नव्याने निर्माण झालेले नाहीत. परंतु काश्मीरमध्ये पुन्हा घडलेल्या हल्ल्याने आणि त्यावर भारताने दिलेल्या कडक उत्तराने हे संबंध अधिकच ताणले गेले आहेत. सिंधू पाणी करार रद्द करून आणि पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश देऊन भारताने आपल्या भूमिकेची स्पष्टता दाखवली आहे.
नागपूरमध्ये उघडकीस आलेली ही माहिती संपूर्ण देशासाठी सतर्कतेचा इशारा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली प्रत्येक पाऊल आता महत्त्वाचे ठरत आहे. नागपूर पोलीस प्रशासन आणि केंद्रीय यंत्रणा या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच यावर आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत.