
होळीच्या सणाला एकमेकांवर रंगांची उधळण केली जाते. या रंगांमुळे लागणारे ‘दाग अच्छे होते है’ असं मानलं जातं. परंतु गडचिरोलीतील एलएक्युद्वारे होणाऱ्या खंडणीचं वसुली प्रकरण विधान परिषदेत उपस्थित करीत भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधिमंडळातील बाकांचा गैरवापर करणाऱ्यांच्या चेहऱ्याला वंगणच फासलं आहे.
पूर्व विदर्भातील भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके तसं शांत व्यक्तीमत्व. उगाच कोणाच्या चौकटीत शिरायचे नाही. कोणी आपल्या चौकटीत आले तर सोडायचे नाही, असा त्यांचा स्वभाव. अशातच पूर्व विदर्भातील राइस मिल मालकांना धमक्यांचं सत्र सुरू झालं. विशेषत: गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकार वाढीस लागला. धानाच्या भरडाईत गैरप्रकार करणाऱ्या राइस मिल मालकांना काही खंडणीबहाद्दरांनी धमकाविणं सुरू केलं. पैसे द्या नाही तर विधिमंडळात ‘एलएक्यु’ लावला जाईल, असा धाक त्यांना काही एजन्ट दाखवत होते. धमकी देणारे हे एजन्ट विरोधी पक्षातील काही नेत्यांचे चेलेचपाटे आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत बुधवार, 12 मार्चला आरोपांची पिचकारी खंडणीखोर एजन्ट्स आणि त्यांच्या नेत्यांवर मारली.
डॉ. फुके यांनी आरोपांचे रंग उधळताच काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यांच्याकडून लागलीच आक्षेपाचा सूर आळवला गेला. विधान भवनातही काहींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळं ‘चोर की दाढी में तिनका’ अशी चर्चा जोरात सुरू झाली. पाण्यावर बुडबुडे येतात आणि नंतर फुटून जातात. तशा पद्धतीने काही नेते बेछूट आरोप करतात. परंतु आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केलेले आरोप हे रंगीत बुडबुडे नव्हते. यावेळीही त्यांच्याजवळ ठोस पुरावे होते. महाविकास आघाडीची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘पेन ड्राइव्ह’ बॉम्बचा सपाटा लावला होता. असाच एक ‘पेन ड्राइव्ह’ बॉम्ब आमदार डॉ. फुके यांनीही खंडणीबहाद्दर एजन्ट्स व त्यांच्या नेत्यांवर टाकला.

Prainay Fuke : ‘एलएक्यु’चा धाक दाखवत नेत्यांच्या एजन्ट्सकडून खंडणी वसुली
नावात काय ठेवलंय?
विधान परिषदेत आमदार डॉ. परिणय फुके लक्षवेधी मांडत असताना खंडणीबहाद्दर एजन्ट व नेत्यांची नावेच सांगा, असा आवाज उठला. विरोधी बाकांवरून आलेल्या या आवाजामुळं व्यथित न होता डॉ. फुके यांनी सगळ्यांनाच ‘रुको जरा सब्र करो’ असा सल्ला दिला. आपण ऑडिओ, व्हिडीओ क्लिपच दिल्या आहेत. त्याची ‘फॉरेन्सिक’ तपासणी होऊ द्या. आपोआपच एजन्ट्स आणि त्यांच्या नेत्यांच्या नावं पुढं येतील, असं डॉ. फुके यांनी सांगितलं. त्यामुळं डॉ. फुके यांनी दिलेल्या ‘पेन ड्राइव्ह’मधून कुणाकुणाचे आवाज अन् कुणाकुणाची नावं पुढं येणार याची प्रतीक्षा आता राजकीय वर्तुळाला आहे.
पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये धान घोटाळा सातत्यानं गाजत आला आहे. मात्र आतापर्यंत एलएक्यु करण्याचा धाक दाखवत राइस मिल मालकांकडून खंडणी वसुली होत नव्हती. प्रथमच यासंदर्भातील आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळात सामान्यांच्या हितासाठी आवाज बुलंद करणाऱ्या नेत्यांपैकीच काहींकडून या प्रकरणात हात काळे केले जात असल्याचे डॉ. फुके यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून दिसत आहे. धान्याच्या कोठारात भरून ठेवलेल्या तांदळात बरेचदा सोंडे होतात. हे सोंडे अख्खा तांदूळ खराब करून टाकतात. गडचिरोलीतील राइस मिल मालकांना एलएक्यु लावण्याचा धाक दाखवत पैसा गोळा करणारे एजन्ट्स म्हणजे असेच सोंडे आहेत. यांच्यावर वेळीच औषधोपचार केला नाही तर पूर्व विदर्भातील तांदूळ नासू शकतो. आता आमदार परिणय फुके यांनी आरोपांचा रंग पिचकारीतून उडवला आहे. त्यामुळं विधिमंडळानं दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करणाऱ्यांची होळी करण्याची आता वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.