
भाजप नेते सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर अखेर पंकजा मुंडेंनी हात जोडून देशमुख कुटुंबीयांची माफी मागितली.
राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांची चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाम भूमिका मांडली आहे. संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशीच्या रात्रीला काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ होते. ते उघडून पाहण्याचीही माझी हिम्मत झाली नाही. अशा निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे त्या म्हणाल्या. तसेच, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे त्यांनी स्वागत केले, मात्र तो आधीच व्हायला हवा होता, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
Maharashtra Budget Session : महायुतीचा मास्टरस्ट्रोक, विरोधकांचा डाव फसला
पंकजा मुंडेंची माफी
पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारनेदेखील या प्रकरणात तत्परता दाखवायला हवी होती. राजीनामा घेणाऱ्यांनी तो आधीच घेतला असता, तर आज हे दिवस बघावे लागले नसते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे महायुती सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात या हत्याकांडामुळे संपूर्ण समाज संतप्त आहे. ही हत्या करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, यामागे कोणाचा हात आहे, हे फक्त तपास यंत्रणाच सांगू शकतील. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण समाजाला कलंक लागला आहे. संतोष देशमुख यांचा समाज आक्रोशात आहे, पण आपल्या राज्यात प्रत्येक गोष्ट जातीपातीवर आधारित केली जाते. कुणीही निर्दयपणे हत्या करतो, त्याला कुठलीही जात नसते, असेही त्यांनी नमूद केले.
दुर्दैवाने, आपल्या राज्यात कुठलीही घटना घडली की लगेच जात-पात ओढली जाते. गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याला जातीचा आधार देऊ नका, असे त्या म्हणाल्या. याच वेळी, त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. त्यांच्या कुटुंबावर जे दुःख कोसळलं आहे, त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. मी त्यांची आणि त्यांच्या आईची हात जोडून माफी मागते, असे म्हणत त्यांनी संवेदनशीलता दाखवली.
धस यांचा हल्लाबोल
भाजपचे सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना थेट आव्हान दिले होते. बीड जिल्ह्यात एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, तरीही त्या शांत आहेत. किमान आतातरी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. त्यांचा आणि धनंजय देशमुख यांचा भाजपशी जवळचा संबंध होता. दोघेही पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते होते. अशा परिस्थितीत पंकजाताईंनी त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वन करायला हवं होतं, असेही त्यांनी ठणकावले होते.
संपूर्ण प्रकरण आता राजकीय वळण घेत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रकरण यापुढे कोणत्या वळणावर जाईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.