महाराष्ट्र

Pradip Padole : एक एक लाभाचं पदं देत केला अन्याय

Bhandara BJP : प्रदीप पडोले यांना अश्रू अनावरण होणे स्वाभाविक

Post View : 1

Author

भाजपने अन्याय केला म्हणून भंडाऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष पदीप पडोले यांनी राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झालेत.

भाजप हा अच्छा अच्छांना संपिवणारा पक्ष आहे, अशी टीका केली जाते. भाजप कधी कोणाला संपवेल याचा नेम नाही. अशा पद्धतीने आपल्यावरही अन्याय झाला. त्यामुळे आपण व्यथित झालो आहे. आता आपण पक्षातून बाहेर पडत आहोत. यापुढे कोणतेही पदर घेणार नाही. कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी भंडारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली व्यथा मांडली. पत्रकारांसमोर ते ढसाढसा रडले. यावरून त्यांच्यावर भाजपने खरच किती अन्याय केला असावा, याची कल्पना येथे.

पडोले यांच्यावर झालेल्या अन्यायाची मालिका प्रचंड मोठी आहे. साधा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता असलेल्या पडोले यांना भाजप आणि त्यातल्या त्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी अन्याय करून सर्वांत प्रथम नगराध्यक्ष केले. पडोले नको नको म्हणत असतानाही त्यांना बळजबरीने नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसविले. अन्याय करणे इथेच थांबले नाही. पडोले नगराध्यक्ष असताना भाजपच्या सरकारने त्यांच्या नगर परिषदेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. पडोले अध्यक्ष असलेल्या नगर परिषदेतील लेखाधिकाऱ्यांचे डोळेही या कोट्यवधी रुपयांची आकडेवारी पाहून फाटले. लेखाधिकाऱ्यांच्या चष्म्याचा नंबर त्यामुळे वाढतच गेला. कॅलक्युलेटरमध्ये आकडेही बसेना इतका निधी दिला गेला. कधी नव्हे तो इतका निधी पडोळे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात देऊन भाजपने त्यांच्यावर खरोखर प्रचंड दबाव निर्माण केला. हा निधी विकास कामांसाठी खर्च करा, असा हा दबाव त्यांच्यावर होता. असा अन्याय कधीही कोणावरही झाला नसावा.

Bhandara BJP : पक्षबांधणीला धार; आले भाजपात काशिवार

दुसरी बळजबरी

नगराध्यक्ष झाल्यानंतर सहसा दुसऱ्या पक्षात कोणाला पुढे जाण्याची संधी दिली जात नाही. परंतु प्रदीप पडोले यांना आता स्वस्थ बसू द्यायचे नाही, यासाठी भाजप त्यांच्या मागे हात धुऊन लागली. त्यांना तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीला उभं करण्यात आलं. काहीही करून पडोळे यांना नगर परिषदेत बसूच द्यायचे नाही, असं जणू भाजपनं ठरविलेलं त्यावेळी दिसलं. मात्र पडोळे यांचं नशिब फार जोरदार होतं. ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं म्हणून सांगा. अन्यथा भाजपनं जो अन्याय त्यांच्यावर नगराध्यक्ष असताना केला, तोच अन्याय ते आमदार झाल्यावरही कायम राहिला असता.

एखादा उमेदवार निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्याला घरी आराम करण्याचा सल्ला सहसा इतर पक्षात दिला जातो. परंतु प्रदीप पडोळे यांची ही विश्रांती भाजपच्या डोळ्यात सलणार होती. भाजपने ठरविले होते की, पडोले यांच्यावर अन्याय कायम ठेवायचा. त्यामुळे त्यांना भंडारा भाजपचं महामंत्री करण्यात आलं. इतकंच नव्हे तर त्यांना चक्क जिल्हा भाजपचं अध्यक्षही करून टाकलं. अन्यायाची सीमा तर त्यावेळी ओलांडली गेली, जेव्हा आणखी एक पद पडोले यांच्या अंगावर टाकण्यात आलं. हे पद होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उपाध्यक्ष. इतकं छोटं पद देऊन भाजपनं पडोळे यांची लायकीच दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

Akola BJP : पराभूत उमेदवार आणू शकेल ‘विजय’?

अश्रू तर येणारच!

सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष हा प्रदीप पडोले यांचा प्रवास खूप संघर्षपूर्ण राहिला आहे. भाजपच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाही नेत्याने त्यांना साथ दिली नाही. पडोळे यांनी हे सगळं मिळविलं ते आपल्या हिमतीवर. आपल्या मनगटाच्या बळावर. आपल्या मर्दांकीवर पण भाजप म्हणजे खाल्ल्या मिठालाही न जागणारा पक्ष. पडोळे यांच्या प्रचंड मेहनतीचं मीठ भाजपनं आजपर्यंत खाल्लं. पडोळे यांच्या जीवावर भंडाऱ्यात भाजप मोठी झाली. पण भाजपनं त्यांच्याशी हलकटपणा केला.

इतकं सगळं दिल्यावर त्यांना नगर परिषदेत पुन्हा संधी देण्यास हरकत काय होती? पण म्हणतात ना? ‘जिस थाली मे खाया उसी में छेद किया’. तसंच भाजपनं केलं. भाजपनं पडोळे यांना एक एक करीत इतकी लाभाची पदं देऊन अन्याय केला की, त्यांना पत्रकारांपुढे ढसाढसा रडण्याशिवाय मार्गच उरला नाही. आता पडोळे बाहेर पडल्याने अख्ख्या भंडारा जिल्ह्यातून भाजप संपणार आहे. भाजपचा झेंडा हाती घ्यायला कार्यकर्ताच काय एखादा शेंबडा पोट्टाही शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळं पडोळे यांची जिरवण्याचा प्रयत्न करणे भाजपला महागात पडेल यात शंकाच नाही. लवकरच पडोले भाजपनं दिलेल्या जिल्हा बँक उपाध्यक्ष पदाचाही राजीनामा फेकणार आहे, असं कळलं आहे. त्यानंतर ते राजकारणातून निवृत्तीचं जीवन आरामात जगणार आहे. त्याला कारणही तसेच आहे ते म्हणजे, ‘पडोले भी सस्ती चिजों का शौक नही रखते.’

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!