राज्यात सध्या भ्रष्टाचारामध्ये असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण वाढले आहे. सांगली जिल्ह्यातील आयएएस शुभम गुप्ता यांचा नाव देखील भ्रष्टाचाराच्या गुंतागुंतीत असल्याचा मुद्दा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मांडला.
बनावट कागदपत्रांची साखळी, खोटी परवानगी आणि लाखोंची लाचखोरी. पूजा खेडकर प्रकरणाची धग अद्याप शमलेली नसताना, महाराष्ट्रातील आणखी एक उच्चपदस्थ अधिकारी चर्चेत आले आहेत. सांगली महापालिकेतील एका लाचखोरीच्या प्रकरणात IAS अधिकारी शुभम गुप्ता यांचे नाव समोर येत आहे. त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेच्या सभागृहात केली आहे. गुप्ता यांच्यावर यापूर्वीही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी योजनेतील घोटाळ्याचा आरोप झाला होता.
म्हशी वाटपात गैरव्यवहार, चुकीच्या पद्धतीने निधी वितरण अशा अनेक प्रकारांमुळे त्यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा आरोपांनंतरही त्यांची सांगली महापालिकेत आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. तिथेही त्यांनी नवनवीन वाद आपल्या नावावर नोंदवले. सांगलीतील प्रकरणात गुप्ता यांचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे. महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांना एका 24 मजली इमारतीच्या परवानगीसाठी तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. या प्रकरणात तक्रारदार तानाजी रूईकर यांनी थेट शुभम गुप्ता यांच्यावरही आरोप केले आहेत.
सखोल चौकशीची मागणी
तक्रारीनुसार, त्या काळात आयुक्त असलेल्या गुप्ता यांचा या संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंध आहे. साबळे हे राज्य सरकारच्या SIT मध्ये सदस्य होते. त्यांनी या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा लाभ घेतल्याचा संशय आहे. डॉ. परिणय फुके यांनी या प्रकरणात शुभम गुप्ता यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, इतक्या गंभीर प्रकरणांमध्ये गुंतलेले अधिकारी अद्याप नोकरीवर कसे काय? हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. काही काळापूर्वी अँटी करप्शन ब्युरोने केलेल्या सापळा कारवाईतही शुभम गुप्ता यांचे नाव समोर आले होते.
Parinay Fuke : खत लिंकिंगचा तोडगा काढण्यासाठी आमदार झाले आक्रमक
शुभम गुप्ता यांच्या नावाने अनेक वेळा भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. गुप्ता यांच्याविरुद्ध गडचिरोलीतील आदिवासी योजनेच्या निधी गबाळ्याचा तपास देखील अद्याप पूर्ण झालेला नाही. विधान परिषदेत उत्तर देताना पंकज भोयर यांनी सांगितले की, या प्रकरणात शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र डॉ. परिणय फुके यांनी थेट मागणी केली आहे की, शुभम गुप्तांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करणे आवश्यक आहे. अन्यथा प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिंबा दिला जात असल्याचा संदेश जाईल.
