
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या प्रगतीसाठी मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या निर्णयाचं स्वागत करत नागपूर आणि परिसरातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ होणार असल्याचं सांगितलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाला बळ देणारा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करणारा 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा रोडमॅप आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही या निर्धाराने साकारलेल्या या बजेटच्या माध्यमातून शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
आमदार डॉ. परिणय फुके यांनी या अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत करताना महायुती सरकार निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला गती देईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले.

विदर्भासाठी तरतूद
आमदार डॉ. परिणय फुके हे नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. या अर्थसंकल्पात नागपूर आणि संपूर्ण विदर्भाच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी, विदर्भातील सिंचन प्रकल्पांना चालना, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, तसेच नवीन औद्योगिक संधींच्या निर्मितीसाठी विशेष पॅकेज देण्यात आले आहे.नागपूर आणि परिसराचा औद्योगिक विकास वाढवण्यासाठी मिहान प्रकल्पाला अधिक गती देण्यात येणार आहे. विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टार्टअप आणि नवउद्योजकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे.
ग्रामीण विकासाला संजीवनी
आमदार परिणय फुके यांच्या पुढाकाराने विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत. पीकविमा योजनेचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती, जलसंधारण प्रकल्प, तसेच जैविक शेतीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, सौर ऊर्जा आधारीत पाणीपुरवठा योजना, शेततळे अनुदान योजना, आणि शेतकऱ्यांसाठी कमी दरात कर्ज योजना लागू करण्यात येणार आहे. हे निर्णय विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करतील.
आरोग्य क्षेत्राला बळकटी
विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरमध्ये नवीन शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. डिजिटल शिक्षण कार्यक्रम, शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार, आणि कौशल्य विकास केंद्रे यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालये, ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य केंद्रे, तसेच मोफत आरोग्य तपासणी योजना लागू केली जाणार आहे. नागपूरमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठीही हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
सर्वांगीण विकास
आमदार डॉ. परिणय फुके हे नागपूर व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत आहेत. नागपूरच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणे, तसेच तरुणांसाठी रोजगार संधी निर्माण करणे या दिशेने त्यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.महायुती सरकारच्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागपूर आणि विदर्भाचा विकास निश्चितच वेग घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवा विकासाचा वेग मिळेल, असा ठाम विश्वास आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.