भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रंगतदार लढत 27 जुलै रोजी पार पडली. या निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील.
सहकार क्षेत्रात परिवर्तनाची वेळ आली आहे आणि हे परिवर्तन फक्त महायुतीच करू शकते. हे शब्द आहेत भंडाऱ्याच्या तेजतर्रार भाजप नेते माजी मंत्री कणखर आमदार डॉ. परिणय फुके यांचे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनलने 21 जागांवर उमेदवार लढविले. परिणय फुके यांनी सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या ‘सहकार पॅनल’ला 21 पैकी 21 जागांवर विजय मिळेल, असा स्पष्ट विश्वास व्यक्त करत सहकार क्षेत्रात आपला डंका ठोकला आहे.
नऊ वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत एकूणच जिल्ह्याचे राजकीय तापमान वाढले असतानाच, फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सशक्त मोर्चेबांधणी करत महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. या निवडणुकीत एनसीपीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, डॉ. परिणय फुके आणि काँग्रेसचे नाना पटोले यांचं राजकीय भविष्य पणाला लागलेले आहे. परंतु परिणय फुके मात्र अत्यंत संयमी, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्धाराने भरलेले दिसले.
बलाढ्य नेतृत्व
भंडाऱ्याच्या सहकार रणभूमीत परिणय फुके यांचे नेतृत्व हे महायुतीसाठी विजयाचे प्रमुख शस्त्र आहे. संघटनशक्ती हे फुके यांचे खरे बलस्थान आहे. त्यांनी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांपासून तळागाळातील सहकारी संस्थांशी असलेला संवाद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी असलेला थेट साक्षात्कार यांचा एक भक्कम पाया उभा केला आहे.
विश्वासार्ह नेतृत्वाच्या बळावर फुके यांनी शेतकरी, कामगार, आणि ग्रामीण मतदारवर्गाच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. शेती, सहकार आणि रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांची सातत्यपूर्ण भूमिका ही नेहमीच मतदारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. त्यांचे बोलणे आणि कृतीतला फरक नसल्याने त्यांच्या शब्दांवर जनतेचा दृढ विश्वास आहे.
उत्साहाचं वलय
या निवडणुकीत त्यांच्यासाठी केवळ जागा जिंकणे नव्हे, तर आपल्या राजकीय प्रवासाला नवसंजीवनी देणारी निर्णायक लढाई आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असली, तरी जनतेच्या पाठबळावर ते अधिक निर्धाराने लढताना दिसत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नावाभोवती उत्साहाचं वलय तयार झालं, ही लाट थेट विजयाच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता अत्यंत प्रबळ आहे. अनेक मतदारांमधून असाही आवाज आला की, परिणय फुके दादांच्या नेतृत्वात महायुतीच सर्व जागा जिंकणार.
मतदान केंद्रावर डॉ. परिणय फुके यांनी 27 जुलै रोजी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना फुके यांनी सांगितले की, महायुतीचा विजय म्हणजे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पारदर्शकता, विकास आणि शेतकऱ्यांसाठी नवा सूर्योदय. आम्ही 21 उमेदवार दिले आहेत आणि सर्वच उमेदवार मतदारांच्या मनात घर करून आहेत. या वेळी जनतेने ठाम निर्णय घेतला आहे.
अपारदर्शक व्यवहारांना आळा
संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे कार्यकर्ते, शेतकरी आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते. सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार, गटबाजी आणि अपारदर्शक व्यवहारांना आळा घालण्याचा निर्धार फुके यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, सहकार क्षेत्र केवळ बँका चालवण्यासाठी नसतं, तर ते शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठी असतं. आणि आम्ही ते बदल घडवून आणू.
ही निवडणूक फक्त आर्थिक व्यवस्थापनाची नाही, तर राजकीय प्रतिष्ठेची कसोटी देखील आहे. महायुतीचा झेंडा यशस्वीपणे फडकवण्यात फुके यांच्या रणनीती, संघटन कौशल्य, आणि लोकप्रियतेची निर्णायक भूमिका राहणार आहे. भविष्यात भंडाऱ्यातील सहकार संस्था आणि बँका पारदर्शक, उत्तरदायी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या बनाव्यात, हे फुके यांचं स्वप्न असून, या निवडणुकीत तो पहिला पाऊल असल्याचं ते आवर्जून सांगतात.
परिणय फुके यांनी दाखवलेला आत्मविश्वास आणि जनतेमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची आपुलकी लक्षात घेता, महायुतीचा ‘सहकार पॅनल’ हा विजयी घोडा ठरण्याची शक्यता प्रबळ आहे. मतमोजणीचे वेध लागले आहेत. भंडाऱ्याच्या सहकार नकाशावर एक नवीन अध्याय कोरला जाण्याच्या मार्गावर आहे, डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात.
