
भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
भंडारा जिल्ह्यात सध्या राजकीय समीकरणांची खिचडी खमंग शिजतेय. नुकत्याच झालेल्या दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस वेगवेगळ्या गटाला हाताशी धरण्याचे प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादी अजित पवार गटाला हाताशी धरले होते. त्यानंतर एका निवडणुकीमध्ये काँग्रेसने शिवसेनेला हाताशी धरले होते. मात्र काँग्रेसची ही चाल पाहता भाजपने ताकद पणाला लावत दूध संघाच्या निवडणुकीत ‘एकहाती’ वर्चस्व मिळवून दाखविले आहे. त्यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये एकच दादा आहे.
पूर्वीच्या राजकीय खिचडीतून काँग्रेसने सत्ता मिळवली खरी, पण भाजपच्या पगड्याशी पंगा घेणे काँग्रेसला नेहमीप्रमाणे चांगलेच महागात पडले. दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष आणि साकोलीचे आमदार नाना पटोले, तर शिवसेनेतून आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या बाजूला भाजपच्या रणनीतीचा पट मांडणारे, विधान परिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी सहकार क्षेत्रातील आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. विशेष म्हणजे, यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात उपस्थित असताना दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेला विजयाचा भोपळा पुढचा आला नाही. भाजपच्या विजयाला कोणीही अडवू शकले नाही. उलट शिवसेनेच्या पदरी निराशाच पडली. या संपूर्ण राजकीय लढाईचे खरे गेमचेंजर असेल तर ते म्हणजे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.

भाऊंच्या बुद्धिमत्तेची जादू
महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्ष असलेले डॉ. फुके हे फक्त काळ्या-पांढऱ्या घरात प्याद्यांची मांडणी करीत नाहीत. तर राजकारणातही त्यांच्या रणनीतीला तोड नाही, असेच आता म्हणावे लागेल. त्यांच्या हुशारी आणि रणनीतीमुळेच भाजपने ‘दादा शिवाय पर्याय नाही’ हे पुन्हा एकदा भंडाऱ्यात सिद्ध करून दाखविले आहे. सहकार विकास पॅनलच्या नेतृत्वाखाली डॉ. परिणय फुके यांनी ही लढाई जिंकली. भाजपच्या संघटनशक्तीचा वापर करत त्यांनी शिवसेनेला मात दिली. 28 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यत शिवसेनेचे जोरदार आभार प्रदर्शन आणि शक्ती प्रदर्शन सुरू होते. शक्ती प्रदर्शन जरी सुरू असले तरीही भाजपच्या काटेकोर रणनीतीसमोर त्यांच्या प्रयत्नांना फारसा परिणाम झाला नाही.
यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेला आपला भोपळा देखील फोडता आला नाही. भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला. या निवडणुकीत भाजपचे डॉ. परिणय फुके यांच्या पॅनलने दमदार कामगिरी करत 6 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसचे नाना पटोले यांच्या पॅनलनेदेखील 6 जागा आपल्या खात्यात जमा केल्या. मात्र सर्वात मोठा धक्का शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बसला. त्यांचे संपूर्ण पॅनल शून्यावरच अडकले. दूध का दूध आणि पानी का पानी, अशीच अवस्था या निकालाने दाखवून दिली. भंडाऱ्यात पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसले डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व कोणीही हादरवू शकत नाही.
Sanjay Rathod : नियोजनाच्या चक्रात यवतमाळच्या भाग्यरेषा फिरल्या
सत्ता असो की सहकार डॉ. फुके यांच्या डावपेचापुढे विरोधकांची गाडी कायम रुळावरून घसरते. भंडाऱ्यात डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वर्चस्व हे अबाधित आहे. भविष्यातही हे समीकरण बदलणे कठीणच आहे. राजकीय डावपेच, सहकारातील मजबूत पकड आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर भाऊंची बुद्धीमत्ता ही भंडाऱ्याच्या राजकारणात अजूनही ‘चेकमेट’ करणारं आहे.
Nitin Gadkari : आत्मनिर्भर भारतासाठी आर्थिक प्रगतीसह संस्कार आवश्यक