
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचे आयोजन पुण्यात 13 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे.
राजकारणात चाणक्यनीती महत्त्वाची असते, आणि येथे प्रत्येक डाव हा बुद्धिबळाच्या पटावर खेळला जातो. कोणाला ‘चेक’ द्यायचा, कोणाला ‘मेट’ करायचा आणि कोणता प्यादा पुढे नेता येईल, याचे काटेकोर नियोजन करणारेच येथे मोठे राजकारणी होतात. अशाच राजकीय बुद्धिबळात अनेकांना चेकमेट करणारे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आता बुद्धिबळाच्या खऱ्या पटावर नवे चेस मास्टर्स घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या पुढाकाराने ‘फिडे महिला ग्रँड प्रिक्स’ बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचं आयोजन पुण्यात केलं जात आहे. येत्या 13 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान ही प्रतिष्ठेची स्पर्धा ‘अमनोरा द फर्न’ येथे पार पडणार आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतासह जगभरातील दिग्गज महिला बुद्धिबळपटू भाग घेणार आहेत.

अनेक खेळाडूंचा सहभाग
बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. यात जागतिक रॅपिड चॅम्पियन आणि ऑलिम्पियाड सुवर्णपदक विजेती ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, ग्रँडमास्टर वैशाली आर, तसेच IM पोलिना शुवालोवा (रशिया), IM अलीना काशलिन्स्कया (पोलंड), IM सालिमोवा नुर्ग्युल (बल्गेरिया) आणि IM मेलिया सालोमे (जॉर्जिया) या खेळाडूंचा सहभाग असेल.
महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. परिणय फुके म्हणाले, ही स्पर्धा महिला बुद्धिबळाचा दर्जा उंचावेल. यातील अव्वल दोन खेळाडू थेट कॅंडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरणार आहेत. याच स्पर्धेतून पुढील विश्व बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हानकर्ता ठरेल. परिणय फुके यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच, बुद्धिबळ क्षेत्रातही त्यांनी मोठी चाल खेळली आहे. भारतीय बुद्धिबळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्याची.
महिलांना प्रोत्साहन
स्पर्धेच्या आयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. परिणिता फुके यांनीही यास दुजोरा दिला. त्यांनी सांगितले, ‘ही स्पर्धा महिलांना बुद्धिबळात प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. विशेषतः IM दिव्या देशमुख हिचा सहभाग हा महाराष्ट्र आणि भारतासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघ ही स्पर्धा (FIDE) महिला ग्रांप्रि मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेतील स्पर्धा जॉर्जिया, कझाकिस्तान, मोनॅको, सायप्रस, भारत आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये होत आहे. यातून निवडलेल्या खेळाडूंना अंतिम बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल.
बुद्धिबळाच्या या स्पर्धेत एकूण 14 खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. सहा खेळाडूंना वाइल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राची युवा बुद्धिबळपटू IM दिव्या देशमुख हिला वाइल्ड कार्ड मिळाल्याने भारतीय बुद्धिबळप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सचिव निरंजन गोडबोले म्हणाले.
वारश्याचे जतन
महाराष्ट्राच्या बुद्धिबळ वारशाला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार या स्पर्धेद्वारे केला जात आहे. महाराष्ट्र चेस असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, पुणे हे बुद्धिबळाच्या क्षेत्रात महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनामुळे पुण्याचा बुद्धिबळ नकाशावर अधिक ठसा उमटेल.
राजकीय बुद्धिबळात अनेकांना चेकमेट करणारे परिणय फुके आता खऱ्या बुद्धिबळाच्या विकासासाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र चेस असोसिएशननं हा भव्य उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राला बुद्धिबळाच्या नकाशावर आणण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. ही स्पर्धा म्हणजे केवळ बुद्धिबळपटूंसाठीच नाही, तर भारतीय बुद्धिबळाच्या भविष्यासाठीही एक मोठी संधी ठरणार आहे.