
नागपुरातील इंदोरा येथील नवबौद्ध मुलींसाठी उभारलेली आयटीआय अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळं शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या बहिणींना आवाज माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत बुलंद केला.
नागपूर शहरातील इंदोरा येथील बेझनबाग भागात नवबौद्ध मुलींसाठी मंजूर करण्यात आलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) अद्याप कार्यान्वित झालेली नाही. प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर पडल्याने अनेक मुलींना गुणवत्तापूर्ण औद्योगिक प्रशिक्षण घेण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. या भागातील गरीब व होतकरू मुलींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. यासंदर्भात भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. आयटीआय संस्था तातडीनं कार्यान्वित करण्याची मागणी केली.
प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक नवबौद्ध मुलींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारने पुढाकार घेऊन ही संस्था लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी केली.

सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्यास स्थानिक मुलींना कौशल्याधारित शिक्षण मिळेल. विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. समाजाच्या आर्थिक विकासातही योगदान देऊ शकतील. नागपूरच्या उत्तर भागातील अनेक नवबौद्ध मुली रोजगारक्षम होण्यासाठी अशा प्रशिक्षण संस्थेची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे ही संस्था तत्काळ सुरू होणे गरजेचे असल्याचे डॉ. फुके म्हणाले.
विधान परिषदेत आयटीआयचा मुद्दा मांडताना डॉ. फुके म्हणाले, राज्य सरकारने तातडीने मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मक पावलं उचलण्याची गरज आहे. यावर त्वरित कार्यवाही झाली, तर येत्या काही महिन्यांतच नवबौद्ध प्रवर्गातील मुलींना औद्योगिक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. स्थानिक प्रशासनाने या विषयावर गंभीर दृष्टीकोन ठेवत आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असल्याचेही आमदार डॉ. परिणय फुके यांनी आवर्जून नमूद केले.
प्रशिक्षण केंद्राच्या या विषयावर विधान परिषदेत चर्चा झाल्याने नागपूरकरांचे लक्ष आता सरकारच्या पुढील पावलांकडे लागले आहे. राज्य सरकारने जर तातडीने निर्णय घेतला, तर हजारो मुलींसाठी एक नवीन संधी निर्माण होईल. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जाईल. नागपूरसारख्या औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेल्या शहरात अशा प्रशिक्षण केंद्रांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा विषय प्राधान्याने हाताळण्याची नितांत आवश्यकता आहे. अशात आमदार डॉ. फुके यांनी या विषयाला हात घातल्यानं हा प्रश्नही तत्काळ मार्गी लागेल असं सांगण्यात येत आहे.