मराठी एकजुटीच्या नात्याने उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने राज्यात खळबळ. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या जोडीला कोरोना काळाशी जोडत टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळेच वारे वाहत आहे. मराठी अस्मितेचे, आत्मविश्वासाचे आणि ऐक्याचे. ५ जुलै रोजी झालेल्या मराठी विजय सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन समान रक्ताचे, पण राजकीय प्रवासात विरुद्ध दिशेने गेलेले नेते एकाच मंचावर आले. त्यातून उभे राहिले एक वेगळेच वादळ. या ऐतिहासिक क्षणानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोषाचा वर्षाव झाला. मराठी माणूस पुन्हा एकदा उभा राहत असल्याचा संदेश जणू राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमटला. या ऐक्याचे राजकीय प्रतिबिंबही लवकरच उमटले.
संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ सदरातून या ऐक्याचा अर्थ, त्याचा परिणाम आणि सरकारवर त्याचा झालेला परिणाम विस्ताराने विशद केला. राऊत म्हणतात, ही लाट म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती पेरणारा आत्मघोष आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे सत्ता-केंद्र या नव्या समीकरणाने हादरले आहेत.याचे विशेष म्हणजे, राजकीय युती अजून अधिकृत झालेली नाही. ठाकरे बंधू एकत्र येताच मराठी अस्मितेला नवे बळ मिळाले असले तरी, महाराष्ट्राच्या अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत.
BJP : संभाजी ब्रिगेड अध्यक्षांवर हल्ला; भाजपच्या रक्तात नाही..
कोरोना काळाची आठवण
हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवतानाच दोन्ही ठाकरे एका मंचावर उभे राहिले. मात्र त्यांचे राजकीय हातमिळवणीचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. राऊत यांचे मत आहे की ही युती झाली तरच महाराष्ट्राला नवी दिशा आणि दिल्लीला नवे सवाल मिळतील. राऊत यांचा दावा आहे की सत्ताधारी हे युती घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्याचे लक्षण म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली भेट. ही भेट केवळ सौजन्याची नाही, तर संभाव्य भूकंपाच्या आधीची घबराट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राजकीय नाट्यात रंग भरताना, भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी यावर अगदीच वेगळ्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. कोविड काळात डॉक्टर आणि कंपाउंडर जसे भेटायचे, तसंच हे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आहे, असं म्हणत त्यांनी या ऐतिहासिक क्षणाला ‘कॉमेडी शो’ची उपमा दिली. त्यांच्या मते, महाराष्ट्रातील जनता हा संपूर्ण प्रकार विनोदाच्या नजरेतून पाहत आहे. संजय राऊत यांना कोणतेही काम नाहीत. भाजपवर टीका केल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस पूर्ण होत नाही असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
Ujjwal Nikam : फोन येताच पंतप्रधान म्हणाले, हिंदी बोलू की मराठी ?