अकोल्यातील न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या कामाचं श्रेय खोटेपणानं घेणाऱ्यांना अकोल्याची जागरूक जनता यावेळी उत्तर देणार आहे. महायुतीच्या खऱ्या प्रयत्नांची बदनामी करणाऱ्यांचा आता भांडाफोड होणार आहे.
काम कोणाचं आणि श्रेय कोणाचं? हा प्रश्न सध्या अकोल्यातील न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाच्या प्रगतीसोबत अधिक तीव्र होतोय. महायुती सरकारच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं श्रेय स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता अकोल्याची जागृत जनता उत्तर देणार आहे, असा इशारा माजी नगरसेवक अभियंता सागर शेगोकार आणि माजी नगरसेवक हरीश काळे यांनी दिला आहे.
प्रत्येक बाबतीत ‘मीच केलं’, ‘माझ्यामुळे झालं’ असं भासवत झगमगाटासाठी झटणारे निलेश देव हे जनतेला दूधखुळे समजण्याचा प्रकार सातत्याने करत आहेत. मात्र जनता आता जागरूक झाली आहे. कोण खरे काम करणारे आणि कोण चमकोगिरी करणारे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. विशेष म्हणजे निलेश देव हे महायुतीवर सातत्याने टीका करून स्वतःला जनतेसमोर सत्यवादी म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनतेने यावेळी त्यांच्या नाटकी भूमिकेचा पर्दाफाश करायचं ठरवलं आहे, असा घणाघात शेगोकार व काळे यांनी केला.
महायुतीचे खरे प्रयत्न
न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाणपूल मंजूर करण्यासाठी तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष प्रयत्न केले. त्यातूनच हा प्रकल्प मंजूर झाला. सध्या जवळपास 70 टक्के काम पूर्ण झालं असून रेल्वे विभागाचं 90 टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या प्रकल्पासाठी 54 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
Super Speciality Hospital : अमरावती बनणार अवयव प्रत्यारोपणाचं हब
राज्य शासनाने आधीच 26 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वाढत्या खर्चामुळे उर्वरित निधीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनात सुरू आहे. या प्रक्रियेस गती देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर सातत्याने प्रयत्नशील आहेत, तर खासदार अनुप धोत्रे रेल्वे विभागाशी संपर्कात राहून काम पूर्णत्वाकडे नेत आहेत.
बदनाम करण्याचा कट
या पार्श्वभूमीवर, निलेश देव हे सातत्याने महायुतीवर टीका करत असून, उड्डाणपूल प्रकल्पाचं श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात शेगोकार आणि काळे म्हणतात, “हे राजकारण केवळ प्रसिद्धीसाठी केलं जात आहे. प्रत्यक्षात काम केलेल्यांना मागे टाकून माईक समोर येणं, हे जनतेच्या भावनांशी खेळणं आहे. यापुढे अकोल्यातील जनता अशा दिखाऊ राजकारणाला थारा देणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या प्रकल्पासाठी सकारात्मक आहेत. लवकरच उर्वरित निधीही मंजूर होण्याची शक्यता आहे. यानंतर उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचं 10 टक्के काम पूर्ण होऊन उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत येईल. यामुळे अकोल्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
शेवटचा इशारा
शेगोकार आणि काळे यांनी ठामपणे सांगितलं, महायुतीच्या प्रयत्नांनी जे काम प्रत्यक्ष सुरू झालं, तेच खऱ्या नेतृत्वाचं चिन्ह आहे. देव कंपनीनं महायुतीला बदनाम करण्याचा ठेका घेतलाय की काय, असा प्रश्न पडतो. मात्र जनता ही खरी न्यायाधीश आहे. ती वेळ आल्यावर खोटं बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
