महाराष्ट्र

Narendra Modi : हेडगेवारांच्या जन्मदिवशी साधला सुवर्णयोग

Nagpur Visit Of PM : संघभूमी ते दीक्षाभूमी नरेंद्र मोदींचा प्रवास

Post View : 21

Author

RSS To Deekshabhoomi : मराठी नववर्षाच्या प्रतिपदा अर्थात गुडीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं हृदयस्थान असलेल्या नागपुरात पोहोचले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा तिथीनुसार गुडीपाडवा म्हणजे जन्मदिवस. डॉ. हेडगेवारांच्या जन्मदिवशी संघभूमी ते दीक्षाभूमी असा नागपूर प्रवास करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आगळावेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपुरात पोहोचल्यानंतर सर्वांत प्रथम नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती स्थळाला भेट दिली. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना करण्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची संघ मुख्यालयाला भेट महत्वाची ठरणार आहे. देशभरात संघाकडून शताब्दी उत्सवासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळं मोंदीची हेडगेवारांच्या जयंतीदिनी संघमुख्यालयाला भेट बरंच काही सांगून गेली. भाजप आणि केंद्र सरकार संघाच्या शताब्दी उत्सवात संपूर्ण ताकदीनं सोबत राहणार असल्याचा संदेश यातून मोदींनी दिला आहे.

PM Modi : राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा पुनस्मरणीय क्षण

संघाशिवाय नाही पर्याय

भारतीय जनता पार्टीच्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठबळाचं मोठं योगदान राहिलं आहे. स्वयंसेवकांच्या साथीशिवाय भाजपला सत्ता मिळविणं अशक्य आहे. नरेंद्र मोदी यांच्या संघ मुख्यालय भेटीनं हिच बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. त्यामुळं संघापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजणाऱ्या अनेक नेत्यांना यातून संघच सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश गेला आहे. संघाशिवाय नाही तरणोपाय हे मोदींच्या नागपूर भेटीतून दिसलं आहे.

संघभूमीनंतर नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीची निवड केली. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान विरोधी असल्याचा आरोप सातत्यानं होतो. संघाला आणि भाजपला आरक्षण संपवायचे आहे. भारतीय राज्यघटना बदलायची आहे, असा प्रचार विरोधकांकडून केला जातो. याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. भाजपला बहुमत मिळालं तर संविधान रद्द केलं जाईल, अशी भीती मतदारांना दाखविली गेली. त्यातून काही घटकातील मतदार भाजपपासून दुरावले. मोदी यांनी संघभूमीनंतर दीक्षाभूमीला दिलेली भेट, हे त्याचं चोख प्रत्युत्तर असल्याचं मानलं जात आहे. संघ मुख्यालयातील अभिप्राय पुस्तकातही मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

नरेंद्र मोदी नागपुरात असताना अनेकांनी हातात संविधानाच्या प्रत हाती घेऊन त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी मोदींच्या ताफ्याचा वेग कमी होता. एप्रिल महिन्यातच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जयंती साजरी होणार आहे. त्यांच्या जयंतीला यंदा 134 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळं डॉ. हेडगेवारांची जन्मतिथी, संघाची शताब्दी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असा तिहेरी योग साधण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं दिसत आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!