प्रशासन

Nagpur : पोलिसांनी नागपुरात उघड केला नंबर प्लेटचा नवा स्कॅम

Fake Number Plate : बाप - लेकाच्या बनावट गेमचा भांडाफोड

Author

नागपूरच्या रस्त्यावर फिरणारी एक आलिशान मर्सिडीस खऱ्या अर्थानं बनावट निघाली. मुंबईच्या नंबर प्लेटचा वापर करून डमी गाडी चालवणाऱ्या बाप-लेकाच्या फसवणुकीचा पर्दाफाश वाहतूक पोलिसांनी थरारक पद्धतीने केला.

नागपूर शहरात थरारक सिनेमाला शोभेल असा प्रकार उघडकीस आला आहे. डमी नंबर प्लेट लावून मर्सिडीस गाडी फिरवणाऱ्या बाप-लेकाच्या कारस्थानाचा भंडाफोड वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे झाला आहे. मूळ मालक मुंबईत आहे. त्यांची कार घरी उभी असतानाच त्याच नंबरची मर्सिडीस नागपूरच्या रस्त्यांवर फिरत असल्याचं समोर आलं आहे.

ही घटना दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी घडली. वाहतूक परिमंडळ सोनेगावचे पोलीस हवालदार सुरेंद्र पगारे हे फोर व्हिलर टोईंग व्हॅनसह कर्तव्यावर होते. त्याच वेळी पुनम मॉलसमोरील रस्त्यावर एक आलिशान मर्सिडीस कार (क्र. MH 02-DZ-5061) नियमबाह्यपणे उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कारवाईपूर्वी त्यांनी ई-चालान मशीनवरून वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक शोधून संपर्क केला. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. मूळ मालक हनित मनजीतसिंग अरोरा हे मुंबईतील मिरा रोड येथे वास्तव्यास असून, त्यांच्या मते त्यांची मर्सिडीस तिथेच घरी उभी होती. यानंतर अधिक तपास केला असता समजले की नागपूरातील संबंधित गाडीवर यापूर्वीही दोन ओव्हरस्पीडचे चालान झाले होते. त्यावरून हनित अरोरा यांनी ठाणे शहरातील काशिमिरा वाहतूक विभागात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दिली होती. कोणीतरी त्यांच्या गाडीचा नंबर वापरून गुन्हेगारी हेतूने दुसरी गाडी फिरवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

Harshwardhan Sapkal : मिशनचे पाणी सत्तेच्या वाळवंटात हरवले

कागदपत्रांची चौकशी

तपासादरम्यान, नमूद गाडी चालवत असलेले हरिष तिवारी हे त्यांच्या पत्नीसह घटनास्थळी आले. त्यांनी गाडी स्वतःची असल्याचा दावा केला. मात्र गाडीची कागदपत्रे विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्या मुलगा यश तिवारी याला बोलावण्यात आले. पण तोही कागदपत्राबाबत स्पष्ट माहिती देऊ शकला नाही. या संशयावरून पोलिसांनी गाडी सिताबर्डी वाहतूक विभागात आणली. काही वेळाने कागदपत्रांची चौकशी केली असता खरी खरी माहिती समोर आली. गाडीचा मूळ क्रमांक होता MH 31-EX-9993, म्हणजेच गाडीच्या चेसीस आणि इंजिन नंबरनुसार ती नागपूर येथील होती. डमी नंबर प्लेट लावून ती मुंबईच्या मर्सिडीससारखी दाखवली जात होती.

पोलिसांकडून अधिक विचारणा केल्यानंतर हरिष तिवारी यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार त्यांचा मुलगा यश तिवारी यानेच आखलेला होता. या डमी नंबर प्लेटचा हेतू म्हणजे पोलिसांची दिशाभूल करणे, चालान टाळणे, अपघात झाल्यास जबाबदारी झटकणे आणि मूळ मालकाच्या नावावर दंड लागणे. या धक्कादायक फसवणुकीप्रकरणी हरिष देविचरण तिवारी आणि यश हरिष तिवारी यांच्याविरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Nagpur : माहिती आयोगात तीन शिखरपुरुषांची दमदार एन्ट्री

या प्रकरणात वाहतूक पोलीस सुरेंद्र पगारे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यांनी वेळेवर बुद्धिचातुर्य व चौकसपणा दाखवून, एक मोठी फसवणूक उघडकीस आणली. वाहनचालकांनी आपल्या वाहनावरून मूळ नंबर प्लेट काढून कोणतीही बनावट/डमी नंबर प्लेट लावू नये. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. अशा कृत्याबद्दल कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे. नागरिकांनी अशा प्रकारांची दखल घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!