प्रशासन

Akola : डॉक्टर होण्याआधीच निघाला ड्रग्स डोज विकायला

Drugs : अकोल्याच्या काळोख्या रात्रीत उघड झाला नशेचा नाटकी व्यवहार

Author

अकोल्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘फ्युचर डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएएमएस विद्यार्थ्याजवळ एमडी ड्रग्ज आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातल्या शांत आदर्श कॉलनीच्या रस्त्यावर मध्यरात्रीचा काळोख पसरलेला. पोलिसांचा सुसज्ज गस्त पथक सावधपणे दबा धरून बसलेला आणि इतक्यात दोन दुचाकीस्वार ड्रग्ज व्यवहारासाठी दाखल होतात. त्यांची हालचाल झालीच होती की, खदान पोलिसांनी वीजवेगाने धाव घेत चौफेर घेराव घालून दोघांना पकडलं. एका कॉलेज युवकासह त्याच्या नातेवाईकाच्या अटकेने अकोल्यात खळबळ उडाली आहे. ‘डॉक्टर’ होणाराच आता ‘ड्रग डीलर’ निघाल्याचे उघड झाले आहे.

ही घटना केवळ पोलिस कारवाई नव्हे, तर अकोल्यात सुरू होणाऱ्या नशेच्या आगीचा भयानक इशारा आहे. खदान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक मोहम्मद यासिन मोहम्मद आसिफ (वय 23) हा बीएएमएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी असून दुसरा आरोपी मुश्ताक खान हादीक खान (वय 47) हा त्याचा नातेवाईक आहे. त्यांच्याकडून 46 ग्रॅम 30 मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन दुचाकी, दोन मोबाईल असा सुमारे 3.50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एमडी जप्त

खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा सापळा रचण्यात आला होता. मंगळवारी मध्यरात्री आदर्श कॉलनीत दोन्ही आरोपी दुचाकींवरून व्यवहाराच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. यासिनच्या फुलपँटमधील एका प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून ठेवलेला एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला. त्याचे वजन 46.30 ग्रॅम एवढे होते. जे अमली पदार्थाच्या व्यवहारात ‘कमर्शियल क्वांटिटी’मध्ये मोडते.

ही अकोल्यातील दुसरी मोठी एमडी ड्रग्ज कारवाई आहे. याआधी 4 ऑक्टोबर 2024 मध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील एका शेतात सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली होती. तेव्हा तब्बल 2 कोटींहून अधिक किंमतीचा एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. यानंतर आता अकोल्यातच ‘फुटपाथवर’ ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न उघडकीस येणं हे गंभीर आणि धोक्याचं लक्षण मानलं जात आहे.

Abhijit Wanjarri : पावसाळी अधिवेशनात आदिवासी प्रश्नांची वीज कडाडली

साखळी उकलण्याचा तपास

पोलीस निरीक्षक केदारे यांनी स्पष्ट केलं की, आरोपी हे ड्रग्ज कोठून आणतात, कुणाकडून विकत घेतात, शहरात आणखी कोणी यामध्ये गुंतलेलं आहे का, याची साखळी उकलण्याचा तपास सध्या सुरू आहे. मोठ्या शहरांमधून ड्रग्ज लहान शहरांमध्ये पोहोचत असल्याचं हे दृश्य नक्कीच धोकादायक आहे.

या प्रकरणातून एक अत्यंत गंभीर बाब समोर येते की, महाविद्यालयीन विद्यार्थी आता नशेच्या विळख्यात अडकू लागले आहेत. ‘डॉक्टर’ होण्याचं स्वप्न बाळगणारा विद्यार्थी जर अमली पदार्थ विक्रीत सापडतो, तर मग पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीबाबत आणि वागणुकीबाबत अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कुठे जातात, कोणासोबत असतात, काय बोलतात यावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.

ड्रग्ज व्यवहार, रेव्ह पार्ट्यांचा उल्लेख मोठ्या महानगरांमध्ये सर्रास होतो. मात्र अकोल्यासारख्या तुलनेने शांत आणि मध्यमवर्गीय शहरात जर एमडी ड्रग्ज सापडतो, तर हे नशेच्या विषाणूने पाय रोवण्याचे संकेत आहेत. प्रशासन आणि नागरिकांनी याकडे गंभीरतेने पाहणे, तरुण पिढीचा मानसिक आणि सामाजिक आरोग्य रक्षण करणे आता काळाची गरज आहे. खदान पोलिसांनी दाखवलेली तत्परता वाखाणण्याजोगी आहे. मात्र एक सत्य हेही आहे की, ही सुरुवात आहे, शेवट नाही. अमली पदार्थांचा मागोवा घेणं, मुळाशी जाऊन त्याची पुरवठा साखळी मोडणं, आणि समाजात याविषयी जनजागृती करणं हाच या लढ्याचा पुढचा टप्पा असणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!