
नागपूरच्या पोलिस दलाने पुन्हा एकदा राज्यभरात आपली छाप पाडली आहे. डीजी इन्सिग्निया पदकासाठी निवड झालेल्या 22 पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान त्याच्या कर्तृत्वाची साक्ष देतो.
राज्याच्या शांततेसाठी निष्ठेने आणि धैर्याने कार्य करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना दरवर्षी दिला जाणारा पोलिस महासंचालक (डीजी) इन्सिग्निया पदक हा एक अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. यंदाच्या वर्षी राज्यभरातील तब्बल 800 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा मानाचा पदक देण्यात येणार आहे. नागपूर विभागासाठी ही बाब विशेष गौरवाची ठरली आहे. नागपूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील एकूण 22 अधिकारी व कर्मचारी यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

यादीत सर्वात लक्षणीय नाव ठरते ते म्हणजे नक्षलविरोधी अभियानात विशेष कार्य करणारे ‘स्पेशल अॅक्शन ग्रुप’चे एसपी संदीप पखाले. वर्ष 2012 मध्येही त्यांना हा पदक मिळाला होता आणि त्यांच्या अतुलनीय नेतृत्वक्षमतेमुळे त्यांना पुन्हा एकदा हे पदक प्रदान करण्यात येत आहे. नक्षलग्रस्त भागात त्यांनी दाखवलेले धैर्य आणि प्रभावी कारवाई यामुळे त्यांचा सन्मान राज्यभरात केला जात आहे. याचबरोबर, एसआरपीएफ ग्रुप क्रमांक 4 चे उपअधीक्षक दादा ईश्वरकर यांचाही डीजी पदकप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये समावेश झाला आहे.
गौरवपूर्वक सन्मान
नागपूर शहर पोलीस दलातील अन्य सन्मानप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये पांचपावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार बाबूराव राऊत, जूनी कामठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश आंधळे, गणेशपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार मच्छिंद्र पंडित यांचा समावेश आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे निरीक्षक कैलाश बाराभाई यांचाही या यादीत गौरवपूर्वक समावेश झाला आहे. तसेच, सिटी पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी यंदा डीजी पदकाचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये पीएसआय सुरेंद्र सिरसाठ, एएसआय प्रमोद चौधरी, प्रशांत लाडे, राजेश क्षीरसागर, नरेंद्र दुबे. मंजीतसिंह बहादूर, हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबालकर, महेश कुरसुंगे, जितेंद्र तिवारी, रणजीत गवई, सचिन ठोंबरे, रजनी नागुलवार यांचा समावेश आहे.
Vipin Itankar : शिक्षकांनंतर आता बोगस डॉक्टरांची देखील हकालपट्टी
महिला पोलिस कर्मचारी पूजा माणिकपुरी याही या वर्षीच्या सन्मान प्राप्तकर्त्यांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय, पोलीस प्रशिक्षण केंद्रातील हेड कॉन्स्टेबल ताहिर हुसेन अब्दुल जलील आणि यूओटीसीचे एएसआय नौशाद अली हैदर अली हे देखील यंदा डीजी इन्सिग्निया पदकाने सन्मानित होणार आहेत.
या सर्व सन्मानप्राप्त पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेत प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनतेच्या सुरक्षेसाठीचा अपार समर्पणभाव दाखवून राज्य पोलिस दलाच्या गौरवात भर घातली आहे. या पदकामुळे त्यांच्या कार्याची अधिक व्यापक पातळीवर दखल घेण्यात आली असून, हे सन्मान भविष्यातील अधिक कार्यक्षम सेवेसाठी प्रेरणादायक ठरणार आहेत. अशा प्रकारे नागपूरच्या पोलिस दलाने राज्यात एक आदर्श उभारला आहे. त्यांच्या कार्याची ही पावती संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद आहे.