संपादकीय/लेख/विश्लेषण

बेताल वाचाळवीर Leader उचलतात जीभ, लावतात टाळूला

सभ्यता, संस्कृतीचा विसर; Politics होत आहे दूषित

Author

राज्यातील काही नेते उचलली जीभ की लावली टाळूला असा प्रकार सर्रासपणे करीत आहेत. कोणता नेता कधी काय बोलेल याचा नेम नाही. काही नेते तर आरोप-प्रत्यारोप करताना पातळी सोडत आहेत. 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं. सुसंस्कृत देशा, सभ्यतेच्या देशा असंही आतापर्यंत महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं. पण अलीकडच्या काळात राजकीय वर्तुळात प्रदूषण वाढलं आहे. कोणता नेता कधी काय बोलेल याचा नेम नाही. असाच प्रत्यत आणून दिला आहे, तो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी.

एकनाथ शिंदे सभ्य, सुसंस्कृत आणि तारतम्य ठेवत बोलतात. पण त्यांचा हा आमदार तेवढाच बेताल आहे. कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या पायासमोर हा आमदार लोळण घेत होता. ठाकरेंचा खुश करण्यासाठी गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे विषाणू कोंबण्याची भाषा केली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींशी गायकवाड यांचे वादही आहेत. काही नेत्यांबद्दल त्यांची यापूर्वीही असभ्य भाषेचा वापर केला आहे. बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी तर गायकवाड यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे यांना चर्चेसाठी बोलावून घेतलं होतं.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विनंती केली म्हणून शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावरून विजयराज शिंदे यांचं वजन आणि गायकवाड यांची पातळी याची कल्पना बुलढाणेकरांना आली. आताही बोलताना त्यांनी मतदारांना चक्क वेश्या संबोधलं आहे. वेश्या या शब्दापेक्षाही अत्यंत घाण शब्द त्यांनी वापरला आहे. त्यामुळं कलीयुगातील राजकारणात नेते पातळी सोडूनच बोलतील याचा संदेश लोकांमध्ये गेला आहे.

शिंदेचा बुलढाण्यातील MLA जाहीरपणे बोलला अश्लील भाषेत

नेत्यांवर Control गरजेचा

राजकीय वर्तुळात कार्यरत असलेल्या काही नेत्यांच्या जीभेवर लगाम कसणं आता खूपच गरजेचं झालं आहे. अमोल मिटकरी, संजय गायकवाड, रवी राणा, नवनीत राणा, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत ही ती नावं. गायकवाड यांनी आपल्या वागण्या बोलण्यातून याआधीही आपलं हसू करून घेतलं आहे. वाघाच्या गळ्यातील दाताची गायकवाड यांची डरकाळी फुसकी निघाली. अशीच चमकोगिरी आणि बेताल वक्तव्य अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा करीत असतात.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी विजयापूर्वीच अभिनंदनाचे फलक उभारले. वास्तविकतेत त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यावरून त्यांचं चांगलंच हसू झालं. त्यांचे पती आमदार रवी राणाही असेच तोंडघशी पडले. कॅबिनेट मंत्री झाल्याच्या आशयाचे फलक त्यांनी अमरावतीभर लावून घेतले. पण त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. राणा दाम्पत्यही अनेकांवर जहरी टीका करीत असतात. महायुतीमधीलही अनेक नेत्यांवर ते बोलले आहेत.

अकोल्याचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना तर अजित पवार यांनी आपले सुपुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सज्जड शब्दात समज दिली. ती देखील जाहीरपणे सोशल मीडियामधून. राष्ट्रवादी काँग्रेसचे आपणच मालक असल्याच्या तोऱ्यात मिटकरी वागत सुटले होते. टीव्हीवर सतत दिसण्याच्या नादात ते उठसूट प्रतिक्रिया देत सुटले होते.

मनसे प्रमुख राज ठाकरेंवर त्यांनी टीका केली. या वादामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यकर्त्याचा बळी गेला. एका आईची कूस उद्ध्वस्त झाली. त्या आईचं मन आपल्या मुलाचा बळी घेणाऱ्यांना माफ करेल का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं ज्यानं त्यानं स्वत:ला विचारणं गरजेचा आहे. पार्थ अजित पवार यांनी समज दिल्यानंतर आमदार मिटकरी आता कुठे थोडे शांत झाल्याचं दिसत आहेत. नितेश राणे, भास्कर जाधव हे देखील अशांपैकी एक. ते देखील भडक बोलायला मागेपुढं पाहात नाहीत.

NCP मधील बडबडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दोन नेतेही असंच भडक बोलणारे. टीका करण्याच्या नादात हे दोन्ही नेते काय बोलतील, कोणाला बोलतील याचा काहीच नेम नाही. आता तर राजकारणात ‘अगदी एक तर तू नाही, तर मी नाही’ अशी भाषा वापरली जात आहे. मात्र या सगळ्यात काही नेते आजही आपली मर्यादा ओलांडताना दिसत नाहीत. कोणी कितीही टीका केली तरी ते ‘बिलो द बेल्ट’ बोलत नाहीत.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार हे त्यापैकी एक. नितीन गडकरी, अमित शाह, सुप्रिया सुळे, सुधीर मुनगंटीवारही कधी भडक भाषा वापरताना दिसले नाहीत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळसाहेब थोरात हे देखील मर्यादेतच बोलतात. नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनीही कधी मर्यादा ओलांडली नाही. त्यामुळं सामाजिक जीवनात वावरताना सर्वांनी भाषेची मर्यादा पाळणं गरजेचं असतं.

लोकप्रतिनिधी म्हटल्यावर तर अशा मर्यादा पाळणं अधिकच जबाबदारीनं करावं लागतं. याकडं जो दुर्लक्ष करतो त्याला ‘पब्लिक’ योग्य वेळी योग्य ते उत्तर देत असते. लोकांना सगळं काही ठाऊक असतं. मतदार प्रत्येक गोष्ट बारकाईनं नोंदवत असतो. योग्य वेळ आली की तो योग्य तो निर्णय घेतो. त्यामुळं अशा वाचाळवीरांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनीच एकदा समज देणं गरजेचं असतं. सत्ता असेपर्यंत सगळं चालतं. एकदा सत्ता आणि खुर्ची गेली की कोणी कोणाचा वाली नसतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!