महाराष्ट्र

मर्यादा ओलांडाल तर परिणाम भोगाल ! Devendra Fadnavis यांचा दोघांनाा इशारा

शोमधील Ranveer Allahbadia आणि Samay Raina यांच्या वक्तव्यावरून राजकारण

Author

इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये रणवीरने आई-वडिलांच्या नातेसंबंधांबाबत केलेल्या अश्लील विधानामुळे नेटिझन्समध्ये संतापाचा पूर आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फडणवीस म्हणाले की, मी हे विधान ऐकलेले नाही, पण या प्रकरणाबाबत मला माहिती मिळाली आहे. गोष्टी अत्यंत अश्लील पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत, जे पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर हल्ला केल्यास आपले स्वातंत्र्य धोक्यात येते. प्रत्येकाने आपली मर्यादा पाळणे गरजेचे आहे.

चाहत्यांचा रोष

वाद निर्माण झाल्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी मागितली. त्याने कबूल केले की, जो विनोद झाला, तो योग्य नव्हता. मला जे काही बोलायचं होतं, ते अनावधानाने घडलं. मी यापुढे जबाबदारीने वागेन आणि योग्य कंटेंट तयार करण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर त्याने यूट्यूबकडे विनंती केली की, वादग्रस्त भाग व्हिडिओमधून काढण्यात यावा.

मात्र, रणवीरच्या या माफीनाम्यामुळे नेटिझन्सचा राग शमलेला नाही. त्याचे दोन मिलियन फॉलोअर्स कमी झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे.

माओवाद्यांच्या अंताची चाहूल; Gadchiroli मध्ये नवा अध्याय 

फडणवीसांचा कठोर इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर कोणी अशा प्रकारे मर्यादा ओलांडल्या, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. महिलांच्या सुरक्षेवर तडजोड न करता यासंदर्भात ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी अधोरेखित केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही वादग्रस्त विधानावर टीका करत म्हटले की, व्हिडीओ पाहतांना मला एक बाप म्हणून लाज वाटली.

रणवीरच्या विधानामुळे इंडियाज गॉट लेटेंट या शोच्या आयोजकांवरही मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. महाराष्ट्र महिला आयोगाने शोमध्ये अश्लीलता पसरवल्याचा ठपका ठेवला असून आयोजकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या शोवर बंदी घालावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

महापालिकेच्या तिजोरीवर कात्री, कर वाढीशिवाय आर्थिक खेळपट्टी सज्ज

नेटकरांचा संताप

रणवीरच्या विधानामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मर्यादा ओलांडणं योग्य नाही, असे अनेकांनी लिहिले. आम्ही अशा गोष्टींचा विरोध करतो आणि या शोला पाठिंबा देणं थांबवतो, असेही काही चाहत्यांनी सांगितले.

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर अश्लीलता पसरवल्याचा आरोप असून, यामुळे शोच्या इमेजवरही परिणाम झाला आहे. युट्यूबर आणि इन्फ्लुएंसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स असलेल्या रणवीरने समाजमाध्यमांवर आपले म्हणणे मांडले असले तरी, प्रेक्षक त्याच्या भूमिकेला अजूनही विरोध करत आहेत.

वादातून शिकवण?

या प्रकरणामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी एक मोठा धडा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ जबाबदारीने विचार आणि कृती करणं हे आहे, याचा विचार सध्या अनेक जण करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!