महाराष्ट्र

Randhir Sawarkar : मातीच्या पायवाटांना मिळाली डांबरी दिशा

Maharashtra : शेतकरी विकासासाठी राज्यात शेत/पांदन रस्त्यांची समग्र योजना

Author

शेतीला पोहोचणारे पांदन व शेत रस्ते हे ग्रामीण विकासाची खरी नाळ आहेत. आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारातून या रस्त्यांना मजबूत आणि बारमाही रूप देण्यासाठी व्यापक योजना आखली जात आहे.

शेतकऱ्याच्या घामाला आता ठोस रस्ता मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात जाहीर केलेल्या आश्वासनाला आता कृतीचे रूप मिळू लागले आहे. राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या हक्कासाठी समर्पित अशी महत्त्वाकांक्षी योजना आखण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात समितीची पहिली बैठक पार पडली. विशेष बाब म्हणजे या समितीमध्ये आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती झाली. त्यांनी पहिल्याच बैठकीत अत्यंत अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या बैठकीचा मूळ उद्देश राज्यातील शेत आणि पांदन रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र, शाश्वत आणि गुणवत्ता-अनुरूप योजना तयार करणे हा होता. याआधीच्या विविध योजना, विशेषतः रोहयो अंतर्गत शेतरस्ते उभारण्यात आल्या, मात्र त्यांचा दर्जा, टिकाऊपणा आणि सातत्य याबाबतीत अनेक अडचणी आल्या. त्यामुळे आता या योजनांची पुनर्रचना करून नव्याने गावनिहाय नकाशे तयार करून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकानुसार रस्ते उभारण्याचा आराखडा समिती समोर आला आहे.

आराखड्याचं सादरीकरण

बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनातील वास्तव मांडताना स्पष्ट सांगितले की, हे रस्ते फक्त वाहतुकीसाठी नसून, पेरणी, मशागत, मळणी, कापणी आणि उत्पादन बाजारपेठेत पोहोचवण्याचा अवघा प्रवास या रस्त्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे हे रस्ते म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनवाहिन्या आहेत. त्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी नाल्यांची आखणी, वृक्षलागवड आणि हवामानीय अनुकूलतेचा विचार करून तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याचं सविस्तर सादरीकरण केलं.

या समितीमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि राज्य मंत्री आशिष जयस्वाल यांचा सहभाग होता. समिती अध्यक्षांनी प्रस्तावित योजनेबाबत अभ्यासगट स्थापन करून प्रत्येक बाबीचा अभ्यास करून समितीसमोर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामध्ये निधीची उपलब्धता, गावनिहाय प्राथमिकता, रस्त्यांचा दर्जा आणि अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा या सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात येणार आहे.

वेळोवेळी पुनरावलोकन

सावरकर यांनी यावेळी राज्यातील आधीच्या सर्व शेत/पांदन रस्ते योजनांचा सखोल आढावा सादर केला. त्यांनी जोर देऊन सांगितले की, राज्यात अशी एकच परिपूर्ण योजना तयार व्हावी जी भविष्यात सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहील आणि वेळोवेळी तिचे पुनरावलोकन व अद्ययावत रूप घ्यावे.

ही योजना केवळ रस्त्यांची नसून, ती शेतीच्या कणा मजबूत करण्याची सुरुवात आहे. सावरकर यांचे योगदान आणि त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन पाहता, हे निश्चित आहे की राज्याच्या ग्रामीण जीवनशैलीला नवसंजीवनी देणारा हा आराखडा शेतीची दिशा आणि दशा बदलून टाकेल.

राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ बाजाराचा रस्ता नव्हे, तर विकासाची वाट मिळणार आहे आणि त्या वाटेचे नेतृत्व रणधीर सावरकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि झपाटलेल्या आमदाराच्या हाती आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!