महिलांच्या हातात बचतीची चावी आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात कर्जमुक्तीची चाहूल. चिखली येथून उभा राहिला आर्थिक परिवर्तनाचा नवा अंकुर. या प्रवासात पतसंस्था ठरत आहेत आत्मनिर्भरतेचा खरा आधारस्तंभ.
बुलढाण्यात 9 ऑगस्ट शनिवारी एक ऐतिहासिक क्षण घडला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात नवा टप्पा गाठणारा. ‘देवाभाऊ लाडकी बहीण महिला नागरी सहकारी पतसंस्था’चे भव्य उद्घाटन होताच, परिसरात उत्साह, आशा आणि आत्मनिर्भरतेचा नवा झरा उसळला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यात महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी पतसंस्थांची भूमिका किती निर्णायक आहे, हे ठळकपणे समोर आले. सोबतच, महसूल विभागाच्या विविध योजनांचा धावता आढावा सादर करताना शेतकरी कर्जमाफीबाबतही त्यांनी सकारात्मक संकेत दिले.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांचा ऊहापोह करताना सांगितले, गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी शासन कटिबद्ध आहे. ‘लाडक्या बहिणींना’ दरमहा एक हजार 500 रुपये, शेतकऱ्यांना मोफत वीज, तसेच लवकरच गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी हे शासनाचे ठोस पाऊल आहे.
Ravi Rana : शरद पवारांचा पुढचा थांबा थेट पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मध्ये
राज्यासाठी आदर्श
बावनकुळे यांनी पुढे स्वस्तात शेतजमीन मोजणी, विद्यार्थ्यांना अल्पदरात प्रमाणपत्रे, प्रॉपर्टी कार्ड नकाशा योजना, स्वामित्व योजना, पाणंद रस्ता, तुकडेबंदी कायदा रद्द करणे, अशा ऐतिहासिक निर्णयांची माहिती दिली. विशेष म्हणजे, चिखली तालुक्यात राबविण्यात आलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरल्याने ती राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी महिलांच्या आर्थिक प्रगतीच्या वाटचालीत पतसंस्थांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना म्हटले, चिखली तालुका हे पतसंस्थांचे माहेरघर आहे. ‘देवाभाऊ लाडकी बहीण’मुळे महिलांना स्वतःच्या बचतीचे, आत्मविश्वासाचे आणि आर्थिक स्थैर्याचे सुरक्षित छत्र लाभले आहे. हेच कारण की केवळ काही दिवसांत दोन हजार 500 बहिणींनी येथे खाते उघडून या संस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.
Nitin Gadkari : बेरोजगारीवर केंद्रीय मंत्र्यांनी दिला डबल डेकर उपाय
समाजरचना अधिक सक्षम
संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आमदार श्वेता महाले यांनी प्रास्ताविकातून या अनोख्या उपक्रमाची संकल्पना आणि कार्ययोजना मांडली. त्यांनी स्पष्ट केले की, ही महाराष्ट्रातील पहिली महिलांची नागरी सहकारी पतसंस्था असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्याचे ध्येय यात आहे. लोकसंख्येतील जवळपास 40 टक्के हिस्सा असलेल्या महिलांना उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारात प्रोत्साहन देऊन समाजरचना अधिक सक्षम करणे हा या संस्थेचा उद्देश आहे, असे महाले म्हणाल्या.
या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध महिला बचतगटांच्या प्रतिनिधींसह शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचा उत्साह, भाषणांतील जोश आणि महिलांच्या डोळ्यांतील नव्या शक्यतांचे स्वप्न, संपूर्ण वातावरणात बदलाचा आणि प्रगतीचा संदेश देऊन गेले. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, शशिकांत खेडेकर, तोताराम कायदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि तहसीलदार संतोष काकडे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.