प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 विरोधात तीव्र आक्षेप नोंदवले. त्यांनी हे विधेयक तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024 वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ठाम भूमिका घेत विधानसभेतील संयुक्त निवडक समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून या विधेयकाच्या विरोधात कडाडून आक्षेप नोंदवला. रेखा ताई ठाकूर आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सदस्यांच्या वतीने या विधेयकाच्या संपूर्ण मागे घेतल्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी हे विधेयक महाराष्ट्राच्या लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या मुलभूत तत्वांवर आघात करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या विधेयकाला दडपशाही करणारे, अन्यायकारक, घटनाविरोधी आणि मनमानी असल्याचा आरोप करत त्याला तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
विचारांवर आघात
विधेयकाद्वारे राज्य सरकार महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सामाजिक क्रांतीवर प्रहार करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा ही महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची आधारशिला आहे. मात्र, या विधेयकाच्या अंमलबजावणीतून हाच विचार दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले आज जिवंत असते, तर सत्यशोधक समाजाला बेकायदेशीर ठरवले गेले असते, असे ते म्हणाले. गुलामगिरी या पुस्तकाचे प्रकाशन आणि मालकीसुद्धा कायद्याने गुन्हा ठरवली गेली असती. अशा प्रकारचे विधेयक आपल्या मानसिक व सामाजिक गुलामगिरीच्या विरोधात उभी राहिलेल्या क्रांतीकारक विचारांची हत्या करण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
चळवळीला धोका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहाला या विधेयकामुळे बेकायदेशीर ठरवले गेले असते, असे प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. बाबासाहेबांचे “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे घोषवाक्यच बेकायदेशीर ठरवले जाऊ शकते. या विधेयकाचा वापर सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी केला जाईल, असा गंभीर धोका त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दडपण्यासाठी सरकार हे विधेयक आणत असून, हे संपूर्ण राज्याच्या लोकशाही विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे बहुजन समाजाच्या स्वातंत्र्यावर गदा येणार आहे. संविधानिक अधिकार संकटात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधेयक मागे घ्या
महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीच्या मुळावर घाव घालणाऱ्या या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण राज्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले की, हे विधेयक तातडीने मागे घेतले नाही, तर लोकशाही शक्तींना एकत्र आणून संघर्ष केला जाईल.
संविधानाच्या मुलभूत तत्वांना काळिमा फासणारे आणि बहुजन समाजाला संकटात टाकणारे हे विधेयक मागे घेतले गेले पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्यांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा अवमान करणाऱ्या या विधेयकाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला