
भारताने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेलं निर्णायक सैनिकी यश राजकीय नालायकीमुळे वाया गेलं, असा ठपका ठेवीत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा ताशेरे ओढले.
दहशतवादाचे नायनाट करण्याची आणि पाकिस्तानला कायमचं टोकाचं धडा शिकवण्याची सुवर्णसंधी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतापुढे चालून आली होती. हे केवळ एक सैनिकी मिशन नव्हतं, तर पाकिस्तानच्या भवितव्याचा शेवट करणारा एक निर्णायक क्षण होता. पण, याच क्षणी निर्णयक्षमतेचा अभाव आणि परकीय धोरणातील अमेरिकापरस्त झुकाव यामुळे मोदी सरकारने ती संधी हातातून घालवली, असा ठपका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ठणकावून मांडला.
राजकारणात चालून आलेली संधी सोडायची नसते, हा पहिला नियम आहे, अशा शब्दांत त्यांनी सुरुवातीलाच सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. त्यांचे हे खळबळजनक विधान फुले – आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरमच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यानात परवाना भवन (कस्तुरचंद पार्कजवळ, नागपूर) येथे करण्यात आले. व्याख्यानाचा विषय होता, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची भाकितं.

पाकिस्तानचं संभाव्य विघटन
आंबेडकर म्हणाले, 1971 मध्ये इंदिरा गांधींनी बांगलादेश निर्माण करत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. अगदी तशीच परिस्थिती भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून निर्माण केली होती. हा क्षण होता, पाकिस्तानचे पाच तुकडे करून दहशतवादाचा मूळ उखडून टाकण्याचा. पण ट्रम्पधार्जिण्या धोरणांमुळे आणि झुकत्या परराष्ट्र राजकारणामुळे मोदी सरकारने ही निर्णायक खेळी गमावली.
या लढाईत भारत एकटा पडला. कोणतेही ‘मित्र राष्ट्र’ भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाही. उलट, युद्धातून माघार घेतल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या महासत्ता पाकिस्तानला खुलेआम मदत करत असल्याचे वास्तव त्यांनी समोर मांडले.
हिटलरचे वारसदार
इस्त्राईल-इराण संघर्षाचा संदर्भ देत आंबेडकरांनी तीव्र टीका केली. ते म्हणाले, ज्या हिटलरने ज्यूंचा नरसंहार केला, त्या ज्यूंच्या देशाचे समर्थन आज भारत करत आहे. हिटलरचा वारसा जपणाऱ्या विचारांशी सध्याची सत्ताधारी मंडळी किती साम्य साधतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. धर्मांधतेच्या नावाखाली घेतले जाणारे निर्णय देशाला हुकूमशाहीकडे नेणार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी रशियाने सहकार्याची तयारी दर्शवली होती. पण भारताने ती नाकारून अमेरिकेच्या ट्रम्प सरकारसमोर नतमस्तक भूमिका स्वीकारली. परिणामी, पाकिस्तानच्या विरोधात उभं राहायचं महत्त्वाचं सैनिकी आणि कूटनीतिक सामर्थ्य भारताने गमावलं, असे आंबेडकरांनी ठासून सांगितले.
ऐतिहासिक गाफिलपणा
शब्दांना धार देत त्यांनी मतदारांना हाक दिली, देशहित, देशसुरक्षा आणि राष्ट्रीय अभिमान यावर राजकारण करणं गरजेचं आहे. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी घेतलेले परकीय निर्णय देशासाठी घातक ठरत आहेत. याचा बदला जनतेने मतपेटीतून द्यायला हवा.
भारताने जिंकलेलं युद्ध हरावं लागणं ही केवळ सैनिकी चूक नव्हे, तर ऐतिहासिक पातळीवरील राजकीय दुर्बुद्धी आणि आत्मघातकी निर्णयशक्तीचं प्रतीक आहे. अॅड. आंबेडकरांच्या या भाषणाने या गंभीर विषयावर नव्याने चर्चा सुरू केली असून, आगामी निवडणुकांत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.