
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अपमानावर महाविकास आघाडीने मौन बाळगल्याचा आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. मात्र, या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फुले मराठा असते तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरले असते, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या अपमानावर महाविकास आघाडीतील पक्ष गप्प का आहेत, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ११ एप्रिलरोजी आंदोलन करण्यात आले. महात्मा फुले हे ओबीसी होते, त्यामुळे त्यांचा अवमान झाला तरी हे पक्ष शांत आहेत. जर ते मराठा असते, तर हे पक्ष रस्त्यावर उतरले असते, असा थेट आरोप त्यांनी केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई माळी समाजातील होते, त्यामुळे महाविकास आघाडीने त्यांच्या अपमानाकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर दावा त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आजही काही विशिष्ट गट आहेत ज्यांना महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली सामाजिक क्रांती सहन होत नाही.
आंदोलनाची तयारी
चित्रपटावर होणारा विरोध हेच दर्शवतो की, अजूनही जातीयवादी मानसिकता टिकून आहे. सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट रोखण्याचा कोणताही अधिकार नाही. जर त्यांनी चित्रपटावर आक्षेप कायम ठेवला, तर आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांच्या घरासमोर जाऊन निदर्शने करू. आम्ही हे गप्प बसून पाहणार नाही. आंबेडकरांनी राज्य सरकारलाही थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री एकीकडे महात्मा फुलेंना अभिवादन करतात, तर दुसरीकडे त्यांच्यावर आधारित चित्रपटाला विरोध केला जातो. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.
फुलेंचा चित्रपट कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशिवाय प्रदर्शित व्हायलाच हवा, असे ते म्हणाले. महात्मा फुले यांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीने महात्मा फुले वाड्यात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. हा लढा फक्त चित्रपटासाठी नाही, तर विचारांच्या मुक्ततेसाठी आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले. महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून जातिव्यवस्थेवर प्रहार केला.
ऐतिहासिक कार्य
सावित्रीबाईंसोबत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे महान कार्य त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिण्याचा ऐतिहासिक कार्य फुलेंनी केले. नव्या युगातील अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी महात्मा फुले यांचे विचारच आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना, वंचित, शोषित आणि पीडितांचा आवाज बुलंद करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. जय फुले, जय शाहू, जय भीम अशा घोषणांनी त्यांच्या आंदोलनात उत्साह संचारला होता.