अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लादल्याने उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यासाठी थेट पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी नातेसंबंध नव्या तणावाच्या वळणावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क थेट 50 टक्क्यांवर नेण्याची घोषणा करत सर्वांना अचंबित केले आहे. या टॅरिफच्या झटक्यामुळे भारतातील निर्यातदार आणि उद्योग जगतात चिंता पसरली असतानाच, देशातील राजकारणातही उफाळ पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफ धोरणाचा फटका भारताला बसत असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे.
भारताची जागतिक पत घसरवण्यास मोदी जबाबदार आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर हे आक्रमक भूमिका घेत म्हणाले की, भारतावर इतका मोठा कर लावण्याची हिंमत याआधी कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने दाखवलेली नाही. आज जे घडत आहे, त्याला कारणीभूत जर कोणी असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. ते पुढे म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांशी मोदी आणि RSS संबंधित आहेत. त्यांनी 2016, 2020 आणि 2024 अमेरिकन निवडणुकींमध्ये ट्रम्प यांना भारतीय समुदायाकडून मतदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
Harshwardhan Sapkal : अधिकारी बदल्या हे निमित्त, गँगवॉर हे वास्तव
राजकीय निर्णयांचे परिणाम
आता त्याच ट्रम्पकडून भारतावर हे आर्थिक दडपण टाकले जात आहे. भारत-अमेरिका मैत्रीचा गाजलेला हाउडी मोदी कार्यक्रम 2019 मध्ये ट्रम्प यांच्या ह्यूस्टन दौऱ्यात झाला होता. याच कार्यक्रमात मोदींनी अमेरिकन व्यासपीठावरून अबकी बार, ट्रम्प सरकार असा घोष नारा दिला होता. त्याचे पडसाद आता उमटत आहेत, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारची बाजू चांगलीच उघड केली आहे. त्यानंतर 2020 मध्ये ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प हा भव्य कार्यक्रम झाला होता. हा कार्यक्रम बिनराजकीय असल्याचे सांगितल्या गेले होते. पण राजकीय विश्लेषकांनी तो ट्रम्प यांच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष भाग असल्याचा दावा केला होता.
आंबेडकर म्हणतात की, मोदींनी व्यक्तिगत पातळीवर घेतलेले निर्णय आज संपूर्ण भारतासाठी महागात पडत आहेत. भारत कधीच कोणाच्याही दबावासमोर झुकला नाही. झुकणारही नाही. पण पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यायला हवे की, तुमच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांचा परिणाम देशाच्या आर्थिक हितावर होतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी ठासून सांगितले. अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफच्या पार्श्वभूमीवर भारतातील औद्योगिक वर्तुळात अस्वस्थता आहे. पण त्याहूनही मोठे आव्हान आहे, भारताच्या बाह्य धोरणाच्या निर्णय क्षमतेवर उपस्थित होणारे प्रश्न. हेच प्रश्न प्रकाश आंबेडकर सारखे नेते विचारत आहेत. राजकीय खेळीच्या महाजालात अडकलेली भारताची अर्थनीती आता नव्या वळणावर आहे.